सातारा जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; उरमोडीत ९ तर कोयनेत किती टक्के पाणीसाठा..जाणून घ्या
By नितीन काळेल | Published: May 10, 2024 06:16 PM2024-05-10T18:16:28+5:302024-05-10T18:18:53+5:30
सिंचनासाठी सतत मागणी; मान्सूनकडे डोळे
सातारा : जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता वाढत असून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत असल्याने धरणे रिकामी होऊ लागली आहेत. त्यामुळे अनेक धरणांनी तळ गाठला आहे. उरमोडी धरणात अवघा ९ तर कण्हेरमध्ये १४ आणि कोयनेत २८ टक्केच साठा राहिला आहे. त्यातच मागणी आणखी वाढल्यास धरणातील साठा संपुष्टात येणार असल्याने सर्वांचेच डोळे मान्सूनकडे लागले आहेत.
जिल्ह्यातील शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान पर्जन्यमान होते. यावरच जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची मदार असते. मात्र, गेल्यावर्षी जिल्ह्यातच अपुरा पाऊस झाला. सुमारे ३० टक्के पावसाची तूट होती. त्यामुळे सर्वच तालुक्यांत कमी-अधिक फरकाने परिणाम झाला. त्यातच जिल्ह्यात प्रमुख ६ धरणे आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीच्यावर आहे. यातील बहुतांशी धरणे ही भरली नाहीत. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातही ९५ टीएमसीपर्यंतच साठा पोहोचलेला. त्यामुळे धरण भरलेच नाही. तशीच स्थिती कण्हेर आणि उरमोडी या धरणाची होती.
जिल्ह्यातील या धरणाचेच पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी जाते. त्यामुळे ही धरणे कृषी क्षेत्राला आधार देणारी ठरतात. पण, गेल्यावर्षी धरणेच न भरल्याने सिंचनासाठी सतत मागणी वाढत गेली. परिणामी गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून मागणीप्रमाणे सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे.
जिल्ह्यातील कोयना धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती होते. यासाठी पाण्याची तरतूद आहे. तसेच धरणातील पाण्यावर टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या प्रमुख तीन पाणी योजना आहेत. या धरणातील पाणी अधिक करुन सांगली जिल्ह्यासाठी जाते. तसेच सोलापूर जिल्ह्यातील योजनेसाठीही कोयनेचे पाणी सोडण्यात येते. सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी आजही पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सध्या ३१०० क्यूसेकने सांगलीसाठी पाणी सोडले जात आहे. याच धरणात आता २८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ३३.१८ टीएमसीच पाणी आहे. तर उरमोडी धरणावर सातारा आणि माण, खटाव हे दुष्काळी तालुके अवलंबून आहेत.
गेल्यावर्षी उरमोडी धरण भरले नव्हते. पण, सिंचनासाठी पाण्याची मागणी होत होती. त्यामुळे पाणी सोडण्यात आले. आज धरणात अवघा ९ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच एक टीएमसीपेक्षा कमी पाणी धरणात आहेत. तशीच स्थिती कण्हेर धरणाची आहे. या धरणात १.८४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. टक्केवारीत हे प्रमाण १३.९३ आहे. तर कण्हेरमधूनही सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वाई तालुक्यात धोम धरण असून यामध्ये ५.४१ टीएमसी पाणीसाठा आहे. धरणात ३०.७८ टक्के साठा असलातरी सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. तारळी धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मागीलवर्षी कण्हेर, तारळी अन् उरमोडीत अधिक साठा शिल्लक..
जिल्ह्यातील सर्वच धरणांतील पाणी सिंचनासाठी सोडण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यानंतर या धरणातील पाणी तरतुदीनुसार सोडले जाते. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने पाण्याची मागणी वाढली. त्यामुळे धरणे रिकामी होऊ लागलीत. तर गतवर्षी काही धरणांत जादा पाणीसाठा होता. गेल्यावर्षी ९ मेपर्यंत कण्हेरमध्ये ३.५० टीएमसी पाणी होते. तर उरमोडीत ४.७४ आणि तारळी ३.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. कारण, २०२२ मध्ये चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे धरणातील पाण्याला मागणी कमी होती.
जिल्ह्यातील धरणांची स्थिती (टीएमसीमध्ये)
धरण - सध्याचा साठा - टक्केवारी - एकूण पाणीसाठा
कोयना -३३.१८ - २८.०२ - १०५.२५
धोम - ५.४१ - ३०.७८ - १३.५०
बलकवडी - ०.८२ - १७.७८ - ४.०८
कण्हेर - १.८४ - १३.९३ - १०.१०
उरमोडी - ०.९० - ९.०४ - ९.९६
तारळी - २.०८ - ३५.४३ - ५.८५