गावाच्या फेरफटक्यातही शिक्षणाचे धडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:38 AM2021-03-10T04:38:06+5:302021-03-10T04:38:06+5:30
खंडाळा : ‘आपलं गाव सुशोभित असावं, ते स्वच्छ, सुंदर दिसावं,’ हे प्रत्येक ग्रामस्थाचं स्वप्न असतं. हेच स्वप्न वास्तवात ...
खंडाळा : ‘आपलं गाव सुशोभित असावं, ते स्वच्छ, सुंदर दिसावं,’ हे प्रत्येक ग्रामस्थाचं स्वप्न असतं. हेच स्वप्न वास्तवात उतरविण्यासाठी खंडाळा तालुक्यातील शिवाजीनगर गावच्या ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गणित विज्ञानाच्या संकल्पना घरांच्या भिंतींवर रेखाटून त्या बोलक्या बनवल्या आहेत. त्यामुळे गावाचा फेरफटका मारतानाही मुलांचं शिक्षण घडताना दिसत आहे. गावाच्या वैभवात भर पडेल अशा नवीन उपक्रमाची सुरूवात केली आहे.
शिवाजीनगर ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून तसेच सदाशिव भिकू भोसले यांच्या स्मरणार्थ मूलाधार चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्याने सुशोभिकरणातून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
थिंक फॉर डिझाईन यांच्या संकल्पनेतून गणित, विज्ञान व इंगजी विषयावर आधारित स्वच्छ भारत मिशन या अभियानांतर्गत बोलक्या भिंतींद्वारे शिवाजीनगर गाव सुशोभित करण्यात येत आहे. ज्यायोगे स्वच्छता तर होईलच, त्यासोबत परिसर उजळून सुशोभित होऊन मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होईल आणि शिक्षण क्षेत्रात एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येईल.
शिवाजीनगर गावामध्ये गणित, विज्ञान आणि इंग्रजीचे गाव ही संकल्पना भित्तीचित्राद्वारे राबविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व शासकीय कार्यालय, मंदिरे आणि घराच्या भिंतीवर गणितातील सूत्रे, पाढे, विज्ञानातील महत्त्वपूर्ण गोष्टी, इंग्रजी विषयातील सखोल माहिती रंगवून सुशोभिकरणातून शिक्षण हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमामध्ये सर्व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा आणि नवीन संकल्पना, माहिती पुरविली जावी, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात येत आहे.
या उपक्रमांच्या प्रारंभासाठी मूलाधार चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक महेश भोसले, थिंक फॉर डिझाईन संस्थेचे संचालक उमेश पवार, खंडाळा कारखान्याचे संचालक धनाजी डेरे, सरपंच हर्षवर्धन भोसले, उपसरपंच शोभा भोसले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शहाजी भोसले, बाळासाहेब भोसले, ग्रामपंचायत सदस्य सुजित डेरे, राधिका सपकाळ, राजेंद्र भोसले, सुंदर भंडलकर उपस्थित होते.
गावात नवीन शैक्षणिक संकल्पना राबवली जात आहे, याचे समाधान वाटते. मुलांचे शिक्षण अधिक सुलभ होण्यासाठी याचा फायदा होईल, तसेच गावाचे रंगरूप पालटणार आहे. या अनोख्या उपक्रमाला आम्ही सदस्य निश्चितच सहकार्य करणार आहोत, अशी ग्वाही शिवाजीनगरचे ग्रामपंचायत सदस्य सुजित डेरे यांनी दिली.
फोटो ०९खंडाळा-स्कूल
खंडाळा तालुक्यातील शिवाजीनगर येथे थिंक फॉर डिझाईन संस्थेच्यावतीने भिंतीवर चित्रे रेखाटून मुलांना गणित, इंग्रजीचे धडे दिले जात आहेत. (छाया : दशरथ ननावरे)