अंत्यसंस्काराकडे फिरविली पाठ;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:37 AM2021-05-24T04:37:14+5:302021-05-24T04:37:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : एकदा का मृत्यू झाला की या देहाचे काही अस्तित्वच उरत नाही. उरतात त्या फक्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : एकदा का मृत्यू झाला की या देहाचे काही अस्तित्वच उरत नाही. उरतात त्या फक्त आठवणी; परंतु कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांच्या नशिबी आता तेही उरलेले नाही. नातलग अंत्यसंस्कार तर दूर रक्षा विसर्जनालादेखील पाठ फिरवू लागलेत. रक्ताची नातीच गोटू लागल्याने आता स्मशानभूमीत राखेचा खच साचू लागलाय. या राखेचे करायचे तरी काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात काहूर माजवू लागलाय.
सातारा जिल्ह्यात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोना बाधित रुग्णांनी व मृतांनी नवे उच्चांक गाठले आहेत. दररोज ३० ते ४० रुग्ण कोरोनाने दगावत आहेत. अशा मृतांवर साताऱ्यातील संगममाहुली, फलटण तालुक्यातील कोळकी, कऱ्हाड व मलकापूर येथे अंत्यसंस्कार केले जात आहेत. कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम अत्यंत जोखमीचे आहे. तरीदेखील स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरोग्य कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून अंत्यसंस्काराचे काम जबाबदारीने पार पाडत आहेत.
सातारा जिल्ह्यात आतापर्यंत अडीच हजाराहून अधिक रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे. मृताचे नातेवाईक भीतीपोटी अंत्यसंस्काराला येत नाहीत. काही जण अस्थिविसर्जनाकडेदेखील पाठ फिरवितात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाच मृताच्या नातेवाईकांची भूमिका बजवावी लागते. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्यानंतर उरणारी राख एका कुंडात जमा केली जाते. कराड व कोळकी, मलकापूर व कराडच्या तुलनेत साताऱ्यातील स्मशानभूमीत राख कैक टनात जमा झाली असून, या राखेचे आता करायचे काय? असा प्रश्न सध्यातरी उपस्थित झाला आहे.
(चौकट)
कर्मचारीच करतात अस्थिविसर्जन
बहुतांश नातेवाईक अंत्यसंस्कार व रक्षाविसर्जन करण्यासाठी स्मशानभूमीत पाऊलही ठेवत नाहीत. त्यामुळे येथे कार्यरत असलेले कर्मचारी अंत्यसंस्काराबरोबर अस्थिविसर्जनही करतात. जे नातेवाईक येतील त्यांना अस्थी विसर्जनासाठी दिल्या जातात. पुढे नातेवाईक आपापल्या विधिवत पद्धतीने अस्थींचे विसर्जन करतात. मात्र अशा नातेवाईकांचे प्रमाण सध्या तरी कमी आहे.
(चौकट)
कैलास स्मशानभूमी
कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी साताऱ्यातील कैलास स्मशानभूमीत १४ अग्निकुंडांची व्यवस्था आहे. या ठिकाणी दररोज ३० ते ४० मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कारानंतर निघणारी राख स्मशानभूमीत असलेल्या महाकाय कुंडात संकलित केली जाते. सातारा पालिकेचे १७ कर्मचाऱ्यांचे पथक या कामी नेमण्यात आले आहे.
(चौकट)
मलकापूर स्मशानभूमी
कराड पालिकेवरील अंत्यसंस्काराचा ताण वाढू लागल्याने मलकापूर पालिका प्रशासनाने शहरालगत असलेल्या पाचवडेश्वर येथे कोरोना मृतांवर अंत्यसंस्काराची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी अंत्यसंस्कारानंतर जमा होणारी राख नदीकाठी खोदण्यात आलेल्या एका खड्ड्यात जमा केली जाते. नातेवाईक न आल्यास कर्मचाऱ्यांकडूनच नदीमध्ये अस्थींचे विसर्जनदेखील केले जाते.
(चौकट)
कोळकी स्मशानभूमी
फलटण नगरपालिकेने कोळकी या ठिकाणी कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारासाठी व्यवस्था केली आहे. अंत्यसंस्कारानंतर उरणारी राख कर्मचाऱ्यांकडून जमा केली जाते. पुढे पालिकेच्या कचरा डेपोत खोदण्यात आलेल्या महाकाय खड्ड्यामध्ये ही राख संकलित केली जाते. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्काराचे काम अत्यंत सुरक्षितपणे केले जात आहे.
(कोट)
स्मशानजोगी म्हणतात हे तर मन सुन्न करणारे क्षण...
१. कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करताना आजवर अनेक चांगले-वाईट अनुभव आले आहेत. पण करणार काय. पाचवडेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर शिल्लक राहणारी राख आम्ही एका खड्ड्यामध्ये संकलित करतो.
- अमर तडाखे, मलकापूर पालिका
२. गेल्या वर्षभरात सातारा पालिकेने अडीच हजार कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. काम जोखमीचे असले तरी आम्ही ते जबाबदारीने करत आहोत. जेव्हा कोणी नातेवाईक अंत्यसंस्कार व अस्थिविसर्जनासाठी येत नाहीत तो क्षण मनाला चटका देऊन जातो.
- कपिल मट्टू, सातारा पालिका
३. कोरोनामुळे नातीगोती दुरावू लागली आहेत. कोरोनाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराला घरातील एक सदस्यदेखील न येणे यापेक्षा मोठे दु:ख काय असू शकते. आज जो तो जीवाला घाबरू लागला आहे. असे असले तरी आमचा आरोग्यपूर्ण लढा सुरूच आहे.
- विनोद अहिवळे, फलटण पालिका