आराखडे फसू द्या... आम्हाला खो-खो हसू द्या!

By admin | Published: December 4, 2015 09:56 PM2015-12-04T21:56:01+5:302015-12-05T00:18:02+5:30

सभेचाच विनोद : सांगा कसा मिळणार नागरिकांना न्याय; गंभीर प्रश्नांवेळीही सभागृहात निव्वळ हास्याचे फवारे!

Let the hang out hang out ... let us laugh and lose! | आराखडे फसू द्या... आम्हाला खो-खो हसू द्या!

आराखडे फसू द्या... आम्हाला खो-खो हसू द्या!

Next

सर्वसाधारण सभ
सातारा : जिल्हा नियोजन आराखडा कामांच्या याद्यांअभावी अपूर्ण असल्याने तो नामंजूर करण्याची नामुष्की ओढवली. या याद्या अंतिम करण्याची जबाबदारी ज्या जिल्हा परिषद सदस्यांवर, त्यांना मात्र याचे काहीच गांभीर्य नसल्याचे सर्वसाधारण सभेत दिसून आले. गंभीर विषयांवरील चर्चेवेळी सदस्य हसत होते, तर वेळ येताच त्यांनी गोंधळही घातला. ा
विनोद घडल्यावर चेहऱ्यावर हास्य फुलणे, ही स्वाभाविक बाब आहे. पण, गंभीर बाबींमध्येही निष्कारण हसत राहणे, हे वेडाचं लक्षण मानलं जातं! नेमका हाच प्रकार शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाला. जिल्हा परिषदेचे सदस्य आपल्या भागातील समस्या पोटतिडकीने मांडत असताना बहुतांश सदस्य फिदीफिदी हसण्यात गुंग झाले होते.
जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यात राहणारी जनता मोठ्या आशेने जिल्हा परिषद सदस्यांकडे पाहत असते. आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही सदस्य मंडळी आक्रमक भूमिका घेतील, अशी अपेक्षा त्यांना असते. मात्र, लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणाऱ्या विषयांना जाणीवपूर्वक बगल दिली जात असल्याचे चित्र शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभेत पाहायला मिळाले. काही सदस्य पोटतिडकीने आपल्या गटांतील प्रश्न मांडत होते, त्याचवेळी बहुतांश सदस्य केवळ हास्यकल्लोळात बुडाले होते.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हाभरातील जिल्हा परिषद सदस्यांना आपल्या गटातील प्रश्न मांडता येतात. हे प्रश्न पोटतिडकीने मांडून प्रश्नांची सोडवणूक करण्याचा अधिकार घटनेने प्रत्येक सदस्याला दिलेला आहे. जिल्हा परिषदेत भाषण बहाद्दूर भरपूर आहेत; पण जे नवखे अथवा महिला सदस्य आहेत, त्यांनी मांडलेल्या प्रश्नांचाही विचार होणे जरुरीचे आहे.
पहिल्या बाकावरून बाह्यामागे घेऊन बोलणाऱ्या मंडळींइतकीच इतर ६७ सदस्यांवर जनतेने जबाबदारी दिली आहे. रस्ता, एसटी, शेती पंपाची वीज, पाणी बंधारे, कालव्याचे पाणी, शाळा हे मूलभूत प्रश्न अजूनही जिल्ह्याच्या दुर्गम भागात कायम आहेत. हेच प्रश्न अनेक मंडळी सभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतात; पण त्यांच्या विषयांकडे दुर्लक्ष करून हिडीसपणे हसणे सुमारे २५ हजार मतदारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सदस्यांना शोभत नाही.
शुक्रवारच्या सभेतलेच अनेक किस्से पाहिल्यावर याची किळस येते. पाटण तालुक्यातील एक सदस्य सदाशिव जाधव हे शेती पंपाच्या विजेचा प्रश्न गेल्या तीन सर्वसाधारण सभेत सातत्याने मांडत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून शेतकऱ्यांनी मागितलेल्या शेतीपंपाची वीज देण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला. एका नवीन सदस्याने एसटी अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याच्या वारसांना एसटीने मदत नाकारल्याचा मुद्दा उपस्थित केला. कृषी विभागासोबत स्थानिक स्तर विभागाकडील काही गंभीर प्रश्न सदस्य उपस्थित करत असताना सभागृहात बहुतांश सदस्य हसण्यात गुंतले होते. महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झडण्याऐवजी मुद्दाच दाबण्याचा हा प्रकार गेल्या अनेक सभांमध्ये पाहायला मिळतोय. वीजविभाग, एसटी, स्थानिक स्तर व कृषी या विभागांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित नसल्याने हे प्रश्न अनुत्तरितच राहिले.
या सर्व प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या खर्चाने भरविण्यात आलेल्या या सभेत नौटंकी चालत असेल तर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वेगळी बैठक घ्यावी लागेल काय? असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहतोय, हे मात्र नक्की!

अर्चना बर्गेंनी चांगलेच
धारेवर धरले
कोरेगाव तालुक्यातील अंगणवाडी इमारतीच्या प्रश्नावरून अर्चना बर्गे यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. इमारतीची मागणी करूनही अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा मुद्दा त्यांनी ठामपणे मांडला. अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी सारवासारव केल्यानंतरही प्रशासनाने याचे उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी सभेत केली.

माईक हातात घेण्याची हाव!
मला कधी माईक हातात मिळतोय, असं काही सदस्यांना सारखं वाटत असतं. यात एखाद्याने महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला तरी त्याचं उत्तर देणं राहत बाजूला, अन् माईक हातात घेणारा दुसरा सदस्य आपला प्रश्न उपस्थित करतो, त्यामुळे प्रश्नांच्या जंजाळात उत्तर मात्र निरुत्तर होताना दिसते.


आम्हालाही पुढे जागा हवी
जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या सभेत मागे बसलेल्या एका सदस्याने नाराजी व्यक्त केली. काही सदस्यांनी आपल्या जागा ‘फिक्स’ केल्या आहेत. सभागृहात रोटेशन पद्धतीने बसण्याची व्यवस्था करण्यात यावी, तरच आमच्या प्रश्नांना वाचा फुटेल, असं मत या सदस्यानं नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केलं.

Web Title: Let the hang out hang out ... let us laugh and lose!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.