मलाबी मोर्चाला यिवू द्या की रं..

By Admin | Published: July 11, 2014 12:39 AM2014-07-11T00:39:21+5:302014-07-11T00:40:46+5:30

खंडाळा तहसील कार्यालय : अनुसूचित जमातींच्या सवलतींसाठी धनगर समाजबांधवांचा एल्गार

Let me have a chance to join the Malabi Morcha. | मलाबी मोर्चाला यिवू द्या की रं..

मलाबी मोर्चाला यिवू द्या की रं..

googlenewsNext

खंडाळा : राज्यातील धनगर समाजाला अनुचूचित जमातीच्या सवलती जाहीर कराव्यात, यासाठी खंडाळा तहसील कार्यालयावर धनगर समाजातील शेकडो लोकांनी मेंढरांसह मोर्चा काढला. यामुळे तहसील कार्यालयाकडे जाण्याच्या मार्गावर चक्काजाम झाला होता.
पंचायत समितीचे समितीचे सदस्य रमेश धायगुडे-पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी काढलेल्या मोर्चाने खंडाळा शहर गजबजले होते. त्यामुळे आरक्षणासाठी मुक्या जनावरांनीही तहसील कार्यालयासमोर चक्काजाम केल्याचे दिसून येत होते. सवलती न मिळाल्यास आघाडी शासनाच्या विरोधात काम करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
भारतीय राज्यघटनेनुसार धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत केलेला आहे. देशातील हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाना, बिहार, गोवा यासह सात राज्यांमध्ये या सामाजाला अनुसूचित जमातींच्या सवलती दिल्या जातात. वास्तविक हा समाज मेंढपाळ व्यवसायामुळे भटकंती करणारा आहे. देशातील विविध भागांत वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. त्यामुळे ‘संविधानाच्या कलमात ‘धनगड’ असा उल्लेख आढळतो. मात्र, महाराष्ट्रात तो ‘धनगर’ या नावाने ओळखला जातो. केवळ लेखनातील चुकांमुळे महाराष्ट्रातील या समाजाला विविध सवलतींपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने धनगर समाजाला अनुचूचित जमातींच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
त्यांना योग्य त्या सवलती जाहीर करून शासनाने त्यांच्या विकासाचा स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अनेकदा मागणी करूनही शासनाने दखल न घेतल्याने मोर्चा काढण्याची वेळ आली आहे,’ अशा भावना काही कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. आरक्षण सवलतीच्या प्रश्नावर राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
घोडे-मेंढरांचाही सहभाग
राष्ट्रीय महामार्गापासून ते तहसील कार्यालयापर्यंत घोडी, मेंढरं आणि मेंढपाळासह गजीनृत्यांच्या तालावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके, माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, सभापती दीपाली साळुंखे, सदस्य रमेश धायगुडे, जिल्हा परिषदेचे सदस्य माणिकराव सोनवलकर, टी. आर. गारळे, रमेश शिंदे, समता परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र नेवसे, आनंदराव वाघमोडे, राजेंद्र तांबे, नामदेवराव धायगुडे, लताताई नरुटे, शामराव गाढवे, भीमराव बुरुंगले, काशिनाथ धायगुडे आदी उपस्थित होते.

धनगर समाजाचा वापर केवळ मतांसाठी करण्यात आला, त्यामुळे गेली पन्नास वर्षे मेंढपाळांची ससेहोलपट सुरू आहे. आमच्या सवलती आम्हाला मिळायलाच हव्यात, विधानसभेपूर्वी त्या जाहीर न केल्यास या समाजाचाच राजकीय मार्ग वेगळा राहील.
- रमेश धायगुडे-पाटील
सदस्य, पंचायत समिती खंडाळा

Web Title: Let me have a chance to join the Malabi Morcha.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.