अन्नसुरक्षा योजनेचा लाभ गरजूंना मिळू द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:40 AM2021-01-25T04:40:22+5:302021-01-25T04:40:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : खटाव तालुक्यातील अन्नसुरक्षा लाभार्थी योजनेचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. तरीही काही गरजू आणि गरीब ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : खटाव तालुक्यातील अन्नसुरक्षा लाभार्थी योजनेचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. तरीही काही गरजू आणि गरीब पात्र कुटुंबांना या योजनेचा लाभ देणे गरजेचे आहे. पात्र सधन लाभार्थ्यांपैकी ज्यांना सवलतीच्या अन्नधान्याचा लाभ घेण्याची आवश्यकता नसेल त्यांनी अनुदानातून स्वेच्छेने बाहेर पडावे. खऱ्या गरजू गरिबांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनास मदत करावी, असे आवाहन तहसीलदार किरण जमदाडे यांनी केले.
तहसीलदार जमदाडे म्हणाले, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांसाठी खटाव तालुक्यातील उद्दिष्टपूर्ती झाली असली तरी काही हातगाडीवाले, कचरा वेचून उदरनिर्वाह करणारे, भूमिहीन, अल्पभूधारक, कामगार, अल्प उत्पन्न गटातील कुटुंबे, विधवा परित्यक्ता, हमाल अशा खरोखर गरीब आणि गरजूंना या योजनेचा लाभ अद्याप मिळाला नसल्याचे निदर्शनास आले आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडील शासन निर्णयानुसार सवलतीच्या दरात अन्नधान्य लाभ मिळविण्याकरता पात्र लाभार्थ्यांना योजनेची आवश्यकता नसेल तर सवलतीच्या दरात मिळणारे अन्नधान्य नाकारण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातील दुबार नोंदणी, स्थलांतरित, मृत किंवा विवाहित मुली अशा लाभार्थ्यांना वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांपैकी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी डॉक्टर, स्थापत्य विशारद, चार्टर्ड अकाऊंंटंट आहेत, कोणी व्यवसाय कर, विक्रीकर किंवा आयकर भरत असेल किंवा ज्यांच्याकडे चारचाकी वाहन, बंगला आहे, कुटुंबात निवृत्ती वेतनधारक अथवा नोकरदार व्यक्ती आहेत, ज्यांचे उत्पन्न ग्रामीण भागात ४४ हजारांपेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींनी या योजनेतून मोठ्या मनाने आणि स्वेच्छेने बाहेर पडावे. त्यासाठी स्वयंघोषणा पत्र रास्तभाव दुकानात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट
३१ जानेवारीपर्यंत आधार लिंक करून द्या
‘अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका ऑनलाईन आहेत. ज्या सदस्यांच्या नावापुढे आधार क्रमांक दिसत नाही अशा लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानदारांकडे आधार क्रमांक, मोबाईल नंबर रविवार ३१ जानेवारी पर्यंत लिंक करावेत, अन्यथा त्यांना फेब्रुवारीपासून धान्याचा लाभ मिळणार नाही,’ अशी माहिती तालुका पुरवठा अधिकारी श्रीकांत शेंडे व पुरवठा निरीक्षक आनंद शिंदे यांनी दिली.