आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याआधी सावध राहू या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:40 AM2021-04-09T04:40:58+5:302021-04-09T04:40:58+5:30
सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर ...
सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर याचा फार मोठा ताण येऊ शकतो. ब्राझीलमध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली, तशी परिस्थिती आपल्यावर ओढवू शकते. हे लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने निर्बंध पाळणे आवश्यक आहे. परिस्थिती सुधारल्यास हे निर्बंध निश्चितपणे उठतील; मात्र तोपर्यंत काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले, भविष्याच्या काळात कदाचित काही स्ट्रेस येण्याची शक्यता आहे. संपूर्ण सिस्टमवर, सप्लाय चेनवर ताण पडतो. ऑक्सिजन आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास पुरेसा आहे. संसर्ग वाढल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी मी स्वतः संपूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवून आहे. औषध प्रशासन विभागाच्या साहाय्यक आयुक्तांना औषधसाठा पुरेसा आहे की नाही याबाबतची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचा रोजचा अहवाल मी तपासत आहे.
निर्बंध लादले गेले असल्याने व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिक यांना मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे, याबाबत मला जाणीव आहे. तरीसुद्धा कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी काळजी म्हणून ही उपाययोजना केलेली आहे. यासाठी तुम्हा सर्वांचे सहकार्य राहील, अशी मला अपेक्षा आहे.
जे निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यामध्ये राज्य शासन ३० एप्रिलपूर्वीसुद्धा शिथिलता देऊ शकते. मात्र याबाबत मी आत्ताच काही सांगू शकणार नाही. निर्बंध कधी उठवायचे हे खरेतर लोकांच्याच हातात आहे. लोकांनी जर नियमांचे पालन केले, पॉझिटिव्ह केसेसचे प्रमाण कमी राहिले तर राज्य शासन त्याबाबतचा निर्णय घेऊ शकते, असेदेखील जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.