जे पाजतील नवऱ्याला दारू त्याला निवडणुकीत नोटा मारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:39 AM2021-01-13T05:39:54+5:302021-01-13T05:39:54+5:30
सातारा : निवडणुकीत मतदारांना दारूचे आमिष दाखवून पार्ट्या देणा-या नेत्यांच्या विरोधात दारूमुक्ती आंदोलनाने मोहीम सुरू केली आहे. ‘जे पाजतील ...
सातारा : निवडणुकीत मतदारांना दारूचे आमिष दाखवून पार्ट्या देणा-या नेत्यांच्या विरोधात दारूमुक्ती आंदोलनाने मोहीम सुरू केली आहे. ‘जे पाजतील नव-याला दारू, त्याला निवडणुकीत नोटा मारू’ असे फलक आणि पत्रकांचे वाटप करून मतदारांमध्ये जागृती करण्याचे संघटनेने ठरवले आहे.
राज्यात सुमारे १२ हजार गावांत व मोठ्या संख्येने स्थानिक स्वराज्य संस्था, नगर पंचायती आदी ठिकाणी निवडणूक जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीमध्ये उमेदवार व त्यांचे पाठीराखे राजकीय पक्षाचे नेते मतदारांना विविध आमिषे दाखवितात; मटण व दारू सर्रास पाजतात. निवडणूक कालखंडात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असते. युवकांनाही दारू पाजून ते व्यसनाच्या आहारी जाऊन, व्यसनी होतात. हे चित्र प्रत्येक निवडणुकीत बघायला मिळते.
राज्यातील निवडणूक कालखंडात निवडणूक होणा-या क्षेत्रात अवैध व वैध दारू विक्रीला नियंत्रण राहावे यासाठी दारूबंदीसाठी काम करणा-या राज्यातील संस्था, संघटनांनी राज्य निवडणूक आयुक्त, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, उत्पादन शुक्ल विभागाला निवेदने पाठविली आहेत. निवडणूक कालखंडात निवडणूक क्षेत्रात पूर्णपणे दारू विक्रीवर नियंत्रण, गावात पोलीसांचा पहारा, परिसरातील बियर शॉपी, दारू दुकाने, धाबे नियमबाह्य दारू विक्री करणार नाहीत, रात्री उघडे ठेवणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. अनेक महिला संस्था, संघटनांनी गाव परिसरात ‘जे पाजतील माझ्या नव-याला दारू, त्या उमेदवारांना नोटा मारू, जे पक्ष पाजतील दारू-त्यांना कधीच मतदान ना करू’ अशी प्रचार पत्रके काढून, फलक लावून मिरवणूक गावात काढणार आहेत. या उपक्रमात दारूमुक्ती आंदोलनाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सहभागी होणार आहेत.
या आंदोलनाचे संयोजन भाई रजनीकांत यांनी केले आहे. जिल्हानिहाय जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. या अंतर्गत वर्धाला पुष्पा झाडे, यवतमाळला रवी गावंडे, दिलीप भोयर, वाशिम मदन येवले, अकोला राहुल राऊत, राज्य संघटिका रत्नाबाई खंडारे, बुलडाणा अॅड. रत्नमाला गवई, लताबाई राजपूत; व्यसनमुक्ती राज्य सन्मान पुरस्कार प्राप्त माया धांडे, हिंगोली विशाल अग्रवाल, सातारा अॅड. वर्षा देशपांडे, शालिनीबाई वाघमारे, पुणे विभागीय संघटक अॅड. संतोष मस्के, अहमदनगर देवराव अंभोरे, नांदेड बळवंतराव मोरे, अमरावती डॉ. धर्मेंद्र राजपूत, नरेंद्र बैस, रायगड-संतोष ढोरे, गडचिरोली सर्च संस्था, मुक्तिपथ दल, डॉ. अभय बंग, भारतीय जनसंसद अहमदनगरचे प्रदेश अध्यक्ष अशोक सब्बन, हेरंब कुलकर्णी, अॅड. रंजना गवांदे आदी संस्थेचे प्रमुख सहभागी आहेत.
कोट :
लोकशाही मानणा-या आणि मतदानाचा हक्क बजावणा-या मतदाराला मतासाठी दारूचे आमिष दाखविण्याचे फॅड कुटुंबातल्या महिलांसाठी घातक ठरत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकींपासूनच या पध्दतीवर अंकुश आणण्याचा प्रयत्न यातून होणार आहे.
- अॅड. वर्षा देशपांडे, सातारा
.............