बाप्पांच्या मंडपात घुमू दे माणुसकीचा जागर!
By admin | Published: September 8, 2015 09:50 PM2015-09-08T21:50:14+5:302015-09-08T21:50:14+5:30
घेऊ पुन्हा हातात हात : मंडळांची बचत दुष्काळग्रस्तांसाठी ठरू द्या बाप्पांचा प्रसाद लोकमत इनिशिएटिव्ह
सातारा : वेशीवर उभ्या ठाकलेल्या गणपतीबाप्पांना यंदा दिसत नाहीयेत दुर्वांकुरांनी बहरलेली हिरवीकंच कुरणं. आघाडा, शमीपत्रंही सुकलेली. अनेक घरांमधून येत नाहीये ओल्या नारळाच्या मोदकांचा घमघमाट. नद्या-तलाव आटलेले असताना महाराष्ट्र आपल्याला निरोप तरी कुठे देणार, असा बाप्पांंनाच पडलाय प्रश्न. तरी गावागावात सज्ज आहेत ढोलताशे. गजर तर होणारच; पण यंदा जोडीला घुमायला हवा जागर माणुसकीचा... दुष्काळानं चेहरे सुकलेल्या आपल्याच भावंडांसाठी!
श्रावणात सुरू होणारे सणासुदीचे दिवस दिवाळीपर्यंत मनामनात रंग भरत राहतात. परंतु हे रंग खुलतात पावसाच्या सरींनी. यंदा सरीच गायब झाल्यामुळं रंग पडलेत फिके. निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला गिळू पाहतोय भयंकर दुष्काळ. अन्नदात्या शेतकऱ्याच्या शिवारात उगवेना झालंय कुसळ. एरवी तरारलेली पिकं पाहून ‘मोरया’चा जल्लोष करणारे घसे सुकलेत पाण्यावाचून. चाऱ्याविना खुरं घासून तडफडून मरू लागलंय पशुधन. हीच वेळ आहे बाप्पांच्या उत्सवाचं विधायक रूप जगासमोर येण्याची. तहानभुकेनं व्याकूळ झालेल्या भावांना घासातला घास काढून देण्याची. बाप्पांकडून उदात्त विचारांचं वरदान मागण्याची! म्हणूनच खरंखुरं ‘माध्यम’ बनण्यासाठी नेहमीप्रमाणंच सरसावलाय ‘लोकमत’ परिवार.उत्सवप्रिय सातारा जिल्हा बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. चौकाचौकात मंडप उभे राहत आहेत. ढोलांच्या दोऱ्या आवळल्या जात आहेत. सजावटीचं नियोजन होत आलंय. मूर्तिकारांच्या जादूगार बोटांनी बाप्पांच्या मूर्तीत प्राण ओतलाय आणि प्राणप्रतिष्ठेची घडी जवळ येत आहे. परंतु बाप्पांचं आगमन सर्वांसाठीच मंगलमय व्हावं म्हणून आपल्याला यंदा थोडं मन मोठं करायचंय. अनावश्यक खर्चात शक्य तेवढी कपात करून दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसायचेत. मंडपात बाप्पांबरोबर माणुसकीचीही प्रतिष्ठापना करायचीय.
‘संवेदनशील’ ही सातारकरांची ओळख आहे. ‘लोकमत’च्या हाकेला प्रतिसाद देऊन वेळोवेळी त्यांनी ते सिद्ध केलंय. सातारकरांच्या कल्पकतेलाही तोड नाही. उत्सवाचं काटकसरीनं नियोजन करण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. संकटाला भिडताना सातारकरांनी अजिंक्यताऱ्याची धडाडी आणि सज्जनगडाचा विवेकी वारसा महाराष्ट्राला दाखवून दिलाय. हीच सक्रिय संवेदनशीलता मंडपात दिसल्यास दुष्काळग्रस्तांसाठी तोच बाप्पांचा प्रसाद ठरणार आहे. अशा प्रत्येक प्रयत्नांची आदरानं दखल घेण्याचा शिरस्ता ‘लोकमत’ कायम ठेवणार आहे. खर्चात जास्तीत जास्त बचत करून मंडळांनी दुष्काळग्रस्तांना हात द्यावा, असं आवाहन ‘लोकमत’ परिवार करीत आहे. (प्रतिनिधी)
सातारकरांच्या दिलदारपणाला सलाम..
तीन वर्षांपूर्वी जिल्ह्याच्या पूर्वभागात भीषण दुष्काळ पडला आणि चाऱ्याची टंचाई निर्माण झाली. याउलट डोंगराळ पश्चिम भागातील चारा वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडत होता. हाच चारा पूर्वेला नेण्यासाठी हातात हात गुंफून ‘लोकमत’ने साखळी बनवली आणि सहाशे ट्रक चारा दुष्काळग्रस्त जनावरांच्या मुखात पडला.
थंडीनं कुडकुडणाऱ्या झोपडपट्टीतल्या लहानग्यांची वेदना ‘लोकमत’ने वाचकांपर्यंत पोहोचविली आणि जुने गरम कपडे देण्याचं आवाहन केलं. अक्षरश: टेम्पो भरभरून कपडे जमा झाले आणि शेकडो मुलांनी सातारकरांच्या मायेची ऊब अनुभवली.
गणेशोत्सवाची सांगता होत असतानाच गेल्या वर्षी भिंत कोसळून साताऱ्यातील तिघांचा बळी गेला. त्यापैकी बोलेमामांच्या कुटुंबाला तातडीनं मदतीची गरज होती. सातारकरांच्या भक्कम पाठिंब्यानं मामांच्या मुली खंबीर बनल्या आणि ‘बोलेमामांचा वडापाव’ पुन्हा दिमाखात सुरू झाला.
अनेक निराधारांना औषधोपचार, शस्त्रक्रियांसाठी ‘लोकमत’नं केलेल्या आवाहनानुसार सातारकरांनी भरभरून दिलंय. याच वाटचालीचा पुढचा टप्पा आता सुरू करायचाय.
कोयनेची
वीज वाचवूया
‘महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी’ मानलं गेलेलं कोयना धरण ही सातारा जिल्ह्याची शान आहे. मात्र, यंदा धरण भरू शकलेलं नाही. वीजनिर्मितीसाठीचा उपयुक्त पाणीसाठा वेगानं कमी होऊ लागलाय. नेहमीपेक्षा खूपच आधी भारनियमनाच्या संकटाला सामोरं जावं लागण्याची चिन्हं दिसत आहेत. अशा वेळी विद्युत रोषणाईच्या माध्यमातून किती वीज वापरायची, याचा निर्णय मंडळांनी विवेकानं घ्यायचा आहे.