महामार्ग सुरक्षित करून घेऊ
By admin | Published: November 20, 2014 09:39 PM2014-11-20T21:39:20+5:302014-11-21T00:28:40+5:30
पृथ्वीराज चव्हाण : कच्छी कुटुंबीयांचे केले सांत्वन
लोणंद : खंडाळ्यानजीक कंटेनर उलटून रविवारी झालेल्या अपघातात लोणंद येथील एकाच कुटुंबातील चार जणींचा व सुखेड येथील दोन जणांचा मृत्यू झाला होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या मृतांच्या नातेवाइकांची गुरुवारी भेट घेऊन सांत्वन केले. महामार्गावर होणाऱ्या अपघातांबद्दल तातडीने उपाययोजना करायला लावणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
रविवारी कंटेनर उलटून खंडाळ्यानजीक झालेल्या भीषण अपघातात आठ जणांना प्राण गमवावे लागले होते. यात लोणंद येथील एकाच कुटुंबातील साकिना कच्छी, शबाना कच्छी, हवाबी कच्छी, सलमा कच्छी या चौघींचा तर सुखेड येथील नेहा वाघमारे व प्रमोद वाघमारे या बहीण-भावाचा दुर्दैवी अंत झाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदोन्ही कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली. ते म्हणाले, ‘महामार्गावर एसटी बसेस थांबविणे पूर्णपणे चुकीचे असून, त्यामुळे जर अपघात होत असतील तर हा प्रश्न गंभीर आहे. महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व रिलायन्स कंपनीची लवकरच बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्यात येईल. राज्यात सर्वच महामार्गांवर होणाऱ्या अपघातांबाबत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.’
‘खंडाळा व शिरवळ गावांलगत महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांना रिलायन्स कंपनी जबाबदार असून, त्यांच्या चुकीच्या कामामुळे व आडमुठ्या धोरणामुळेच अनेकांचे प्राण गेले आहेत. याबाबतही उपाययोजना करणे गरजेचे आहे,’ असे मत तालुक्यातील नागरिक व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष अॅड. बाळासाहेब बागवान, कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजित निंबाळकर, राहुल घाडगे, गुरुदेव बरदाडे, बापुराव धायगुडे, धनाजी अहिरेकर, गनीभाई कच्छी, महंमद कच्छी, लक्ष्मण शेळके, राजूशेठ डोईफोडे, संजय जाधव, अॅड. बबलू मणेर, तुकाराम क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)