भिंतीवरची चित्रे पाहूया... कवितांच्या गावाला जाऊया! : जकातवाडीला अनोखी सहल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:57 PM2019-05-21T23:57:44+5:302019-05-21T23:58:00+5:30
सातारा : ‘झुक झुक आगीनगाडी, धुराच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया...’ या गाण्याची आठवण प्रत्येक ...
सातारा : ‘झुक झुक आगीनगाडी, धुराच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया...’ या गाण्याची आठवण प्रत्येक उन्हाळा अन् दिवाळी सुटीत होत. पण, काळाच्या ओघात मामा कामधंद्यासाठी पुणे-मुंबईला गेला अन् बच्चेकंपनी साताºयातच राहिली. ही मुलांसाठी मामाच्या नाही, तर चक्क कवितांच्या गावाला गेले.
नव्या पिढीत वाचन संस्कृती रुजावी यासाठी सातारा जिल्ह्यात अनेक उपक्रम राबविले जातात. महाबळेश्वर तालुक्यातील भिलारे हे देशातील पहिले ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यापाठोपाठ सातारा तालुक्यातील जकातवाडीने अभिनव उपक्रम राबविला आहे. गावातील प्रत्येक घराच्या भिंतींवर कविता लिहिल्या आहेत. या गावाला अनेकजण भेटी देत आहेत; पण केवळ कविता वाचणे अनेकदा कंटाळवाणे वाटते. त्याला चित्रांची जोड मिळाली तर मजा आणखी वाढणार आहे.
हीच कल्पना घेऊन कवितांच्या गावात सहल काढण्याची कल्पना पुढे आली. साताºयातील विविध भागात चित्रकलेचे वर्ग भरविले जातात. तेथील मुलांना एकत्र करण्यात आली. सुमारे ३५ मुलं-मुली या सहलीला गेले.
जकातवाडीला सकाळी आठ वाजता गेलेल्या मुलांनी सर्वप्रथम कविता, चित्रे पाहिले. त्यानंतर मुलांच्या हस्तेच चित्रे काढून सहलीचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मुलांनी कवितांच्या आशयाप्रमाणे भिंतीवर आकर्षक चित्रे काढली. आजवर छोट्याच्या कागदावर चित्रे काढणाºया मुलांना दहा बाय दहासारख्या भिंतीच कॅन्व्हास म्हणून मिळाल्या होत्या. त्यामुळे मोठ्या कॅन्व्हासवर चित्रं काढताना मापं कशी घ्यावीत, चित्रं साधारणत: केवढी असावीत, हे मुलांना शिकता आले.
वाचनालयाचे कार्यवाह सुनील लोंढे, ग्रंथालय भारतीचे विश्वास नेरकर, सरपंच चंद्र्रकांत सणस, गणेश कोकरे, वाचनालयाचे अध्यक्ष प्रल्हाद पारटे यांनी मार्गदर्शन केले.कविता कशा कराव्यात याचेही मार्गदर्शन मुलांना मिळाले. यावेळी प्रतीक दळवी, वैष्णवी मोहिते, शुभम पारटे, निर्मला लोंढे, वैशाली पारटे यांनी परिश्रम घेतले.
जादूचे प्रयोग
यावेळी राम सूर्यवंशी यांनी मुलांना जादूचे प्रयोग करून दाखविले. त्यातून त्यांनी जादू कशी असते. हातचलाखी करून फसविले जाते; पण प्रत्येकामागे विज्ञान असते, हे त्यांनी मुलांना समजावून सांगितले सकाळी भिंतीवरील कविता, नास्टा, पुन्हा भिंतीवर भली मोठी चित्रे काढून झाल्यानंतर जादूचे प्रयोग अनुभवास मिळाले. त्यामुळे बच्चे कंपनी जाम खूष झाले होते.
जकातवाडी या कवितांच्या गावाला साताऱ्यातील मुलांची सहल गेली होती. यावेळी भिंतीवर चित्रे कशी काढायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.