‘जरंडेश्वर’प्रश्नी ईडीला शेतकऱ्यांची ताकद दाखवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:26 AM2021-07-11T04:26:33+5:302021-07-11T04:26:33+5:30
कोरेगाव : ‘ईडीने राजकीय हेतूने जरंडेश्वर साखर कारखान्यावर कारवाई केल्याचे स्पष्ट दिसत आहे. या कारखान्यावर जिल्ह्यातील ५० हजार ...
कोरेगाव : ‘ईडीने राजकीय हेतूने जरंडेश्वर साखर कारखान्यावर कारवाई केल्याचे स्पष्ट दिसत आहे. या कारखान्यावर जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. हा कारखाना बंद राहिल्यास कधीही न भरून येणारे नुकसान होणार असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी आमची लढाई आहे. ईडीला कारखान्यावर पाऊल ठेवू दिले जाणार नाही, वेळप्रसंगी शेतकऱ्यांची काय ताकद आहे, हे ईडीला दाखवून देऊ,’ असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला. वडाचीवाडी, ता. कोरेगाव येथे ऊस उत्पादक शेतकरी व पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या संयुक्त सभेत ते बोलत होते. व्यासपीठार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती मंगेश धुमाळ, कोरेगाव पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, बाळासाहेब सोळस्कर-पाटील, किरण साबळे-पाटील, संदीप मांडवे, प्रा. बंडा गोडसे, शिवाजीराव महाडिक, राजेंद्र भोसले, संजय पिसाळ, पै. सागर साळुंखे, सुरेखा पाटील, प्रतिभा बर्गे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सुनील माने म्हणाले, ‘या देशात अनेक नेत्यांची सरकारे येऊन गेली. मात्र, त्यांनी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजप वाढविण्यासाठी ईडीचा वापर करीत आहेत. भाजपचे नेते ४१ कारखान्यांची तक्रार करीत असताना, फक्त जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई का केली, असा सवाल त्यांनी केला. जरंडेश्वर कारखान्यावर जर कारवाई करण्याची ईडीने तयारी केली असली तरी त्यांना कारखान्यावर पाय ठेवू देणार नाही, एवढी शेतकऱ्यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे ईडी आली तरी तिला परत जाऊ देणार नाही.’
यावेळी प्रदीप विधाते, राजाभाऊ जगदाळे प्रा. बंडा गोडसे, किरण साबळे-पाटील, शिवाजीराव महाडिक, बाळासाहेब सोळस्कर-पाटील, संदीप मांडवे, पै. सागर साळुंखे, संजय पिसाळ, प्रतिभा बर्गे यांनी मनोगत व्यक्त केले. भास्कर कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अरुण माने यांनी आभार मानले.
(चौकट)
मुंबईसारखाच इतिहास ‘जरंडेश्वर’बाबत घडवू
ईडी ही राजकीय बाहुली आहे. मुंबईत खासदार शरद पवार यांना चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर मोठा फौजफाटा आणूनही यंत्रणा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या ताकदीपुढे हतबल बनल्या. मुंबईत जसा इतिहास घडविला, तसाच इतिहास सातारा जिल्ह्यात जरंडेश्वर कारखानाप्रश्नी सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी घडवील. यात तीळमात्र शंका नाही, असेही आ. शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.
१०कोरेगाव
फोटो ओळ : वडाचीवाडी येथे ऊस उत्पादक शेतकरी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार शशिकांत शिंदे. शेजारी प्रदीप विधाते, सुनील माने, मंगेश धुमाळ, शिवाजीराव महाडिक, अरुण माने, भास्कर कदम आदी उपस्थित होते.