जरंडेश्वर बाबत रस्त्यावर उतरुन ईडी ला जिल्हाबाहेर काढू : शशिकांत शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 01:00 PM2021-07-21T13:00:38+5:302021-07-21T13:05:14+5:30
Sugar factory Koregaon Satara : कोरेगावचा जरंडेश्वर कारखाना जर कुणाच्या राजकारणापायी बंद करण्याचा प्रयत्न झाला तर कायदेशीर लढाई तर आम्ही लढूच पण अतिरेक झाला तर प्रसंगी रस्त्यावर उतरून ईडी ला जिल्हाबाहेर धाडण्याचे काम येथील शेतकरी करेल असे आव्हान माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले.
कोरेगाव : कोरेगावचा जरंडेश्वर कारखाना जर कुणाच्या राजकारणापायी बंद करण्याचा प्रयत्न झाला तर कायदेशीर लढाई तर आम्ही लढूच पण अतिरेक झाला तर प्रसंगी रस्त्यावर उतरून ईडी ला जिल्हाबाहेर धाडण्याचे काम येथील शेतकरी करेल असे आव्हान माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले.
जरंडेश्वर कारखाना हा जिल्हाची प्रमुख अर्थवाहिनी आहे. ५० हजार शेतकऱ्यांना न्याय देणारा,१५ लाख मे टन गाळप करणारा, सातारा जिल्ह्याला आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा, जिल्हा बँकेला ७ कोटी चा फायदा मिळवून देणारा, अनेकांचे संसार उभा करणारा हा कारखाना जर कुणाच्या राजकारणापायी बंद करण्याचा प्रयत्न झाला तर कायदेशीर लढाई तर आम्ही लढूच पण अतिरेक झाला तर प्रसंगी रस्त्यावर उतरून ईडीला जिल्हाबाहेर धाडण्याचे काम येथील शेतकरी करेल असे आव्हान माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले.
देऊर ता कोरेगाव येथील मुधाई मंगल कार्यालयात जरंडेश्वर कारखाना ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे बोलत होते.
यावेळी जि. प. कृषी सभापती मंगेश धुमाळ, बिचुकले सरपंच प्रशांत पवार, माजी प्राचार्य गुलाबसिग कदम, निलेश जगदाळे, नरशिंग दिसले, शंकरराव कदम, रमेश कदम, सह्याद्री बँकेचे संचालक दिलीप कदम, गजानन मोरे, वैशाली सुतार, कविता देशमुख, राजेंद्र कदम, धनसिग शिंदे, संदीप भोसले, निलेश कदम उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले, जरंडेश्वर कारखान्याबाबत ईडी ने कारवाई सुरू केली आहे. खरंतर ईडी ने कायदेशीर मार्गाने ही लढाई सुरू ठेवावी. यात जे काही समोर येईल ते येईल पण कोणत्याही परस्थितीत हा कारखाना बंद ठेऊ नये. यासाठी हे जनजागृती आंदोलन सुरु आहे.
सध्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गावागावात या बाबत मेळावे घेऊन त्यानंतर एक निवेदन ईडी ला दिले जाईल. या निवेदनाबाबतीत सकारात्मक भूमिका दाखवली तर सहकार्य करू मात्र विरोध केला तर रस्त्यावर उतरून विरोध करु. ही भूमिका घ्यावी लागेल असे आमदार शिंदे म्हणाले.
काहीही झालं तरी जरंडेश्वर चुकीच्या पध्दतीने बंद पडू देणार नाही, हा आमचा निर्धार आहे. हा कारखाना आजही सुरू आहे. तो सुरुच राहील पण जर कोणी याला टाळा ठोकण्यासाठी आलं तर ५० हजार शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल अशी भूमिका आमदार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
एक साखर कारखाना बंद राहिला तर किती मोठे नुकसान होत याची जाणीव आहे. हा कारखाना ज्यांच्या मुळे बंद झाला, त्यानंतर या कारखान्यासाठी अनेक व्यवस्था या ठिकाणी आल्या त्यांना ही या लोकांनी हकलून दिले. आज ही मंडळी दिल्लीला जाऊन आली त्यांनी हा कारखाना ईडी ने चालवावा अशी भूमिका मांडली किंवा सक्षम माणसाला चालवण्यासाठी द्या अशी मागणी दिल्लीत एका नेत्यांना केली.
खरं तर ज्यांच्यामुळे या कारखान्याचा लिलाव झाला ही मंडळी आज कारखाना परत मिळवण्यासाठी धरपडत आहेत. काहींनी तर कारखाना परत ताब्यात आल्याचा आनंद साखर वाटून केला.
अडीच हजार गाळप क्षमता असलेला जरंडेश्वर आज जिल्ह्यात सर्वाधिक साडे बारा हजार गाळप प्रतिदिन करत आहे. चांगला दर देण्या बरोबरच जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांच्या उसाला समाधान कारक दर देत आहे. कामगारांना वेळेत पगार देत आहे. असं असताना चुकीच्या पध्दतीने हा कारखाना कोण बंद पाडत असेल तर जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली जाईल.
प्रास्तविक शांताराम दोरके यांनी तर प्रा गुलाबसिग कदम, सरपंच प्रशांत पवार, कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रदीप कदम यांनी केले