बारामतीला या.. आपण चर्चा करू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:17 PM2017-10-04T23:17:25+5:302017-10-04T23:17:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : साताºयात खासदार गटाने केलेल्या विकासकामांच्या उद्घाटनासाठी खासदार शरद पवार यांनी स्वत: यावे, अशी मागणी उदयनराजे गटाने पवारांकडे केली. त्यावर बारामतीला या चर्चा करू, असे आवतन पवारांनी दिले आहे.
खासदार शरद पवार जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्यासोबतच गाडीतून आले होते. बुधवारी सकाळी खासदार पवार शासकीय विश्रामगृहावर आल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्या आघाडीच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपनगराध्यक्ष राजू भोसले, अॅड. दत्ता बनकर, पाणीपुरवठा सभापती सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी लक्ष्मण गोरे या ठिकाणी उपस्थित होते.
खासदार पवार शिवनेरी दालनात आल्यानंतर खासदार गटाने त्यांच्याशी सातारा शहरातील विकासकामांबाबत चर्चा केली. शहरातील कास धरण उंची वाढविण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला असून, त्याचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे. भुयारी गटार योजना, घनकचरा निर्मूलन प्रकल्प, पोवईनाका येथील उड्डाणपूल या विकासकामांचे भूमिपूजन खासदार शरद पवार यांनी करावे, अशी इच्छा उदयनराजे गटाने यावेळी व्यक्त केली.
सध्या शहरातील विकासकामांच्या मंजुरीवरून दोन्ही गटांत जोरदार श्रेयवाद सुरू आहे. त्यातच खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीविरोधी धोरणे कशाप्रकारे राबवितात. याविषयी राष्ट्रवादीचे नेते तक्रारी करतात.
खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीपासून दूर गेले आहेत, असे दाखविले गेले. पण पवारांनी अजून उदयनराजेंना दूर केलेले नाही, हे बुधवारच्या दौºयानंतर स्पष्ट झाले.
येत्या भाऊबिजेनंतर दुसºया दिवशी बारामतीत या, चर्चा करू,
असे आश्वासनही पवारांकडून मिळाल्याने उदयनराजे गटाला गुदगुल्या झाल्या नसतील तर नवलच. मात्र, यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या गटामध्ये भलतीच अस्वस्थता पसरली.
खासदार शरद पवार यांनी पुण्यातून साताºयापर्यंतच्या प्रवासात खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मावळ्यांना बारामतीत येण्याचे आवतनही दिले.
आमदार बाहेरच थांबले
खासदार शरद पवार यांचे स्वागत करण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे विश्रामगृहावर आले होते. खासदार उदयनराजे व त्यांचा संपूर्ण गट खासदार पवारांशी चर्चा करत असताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले सर्किट हाऊसमध्ये बाहेरच थांबून राहिले होते.