नियमभंग केल्यास लायसन्स ‘सस्पेन्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:46 AM2021-09-09T04:46:45+5:302021-09-09T04:46:45+5:30

कऱ्हाड : वाहतूक नियमाचा भंग केल्यास पूर्वी चालकांना दंड केला जायचा. चालकही दंड भरुन पुन्हा सुसाट सुटायचे ; पण ...

License 'suspended' for breach | नियमभंग केल्यास लायसन्स ‘सस्पेन्ड’

नियमभंग केल्यास लायसन्स ‘सस्पेन्ड’

Next

कऱ्हाड : वाहतूक नियमाचा भंग केल्यास पूर्वी चालकांना दंड केला जायचा. चालकही दंड भरुन पुन्हा सुसाट सुटायचे ; पण आता केवळ दंड भरून पोलिसांचा ससेमिरा सुटत नाही. ठराविक पाच नियमांचे उल्लंघन केल्यास चक्क चालकाचे ‘लायसन्स’ रद्द केले जातेय. कऱ्हाडच्या वाहतूक पोलिसांनी ‘आरटीओ’ला तसा प्रस्ताव पाठवून गत साडेतीन वर्षात ५२१ चालकांची लायसन्स ‘सस्पेन्ड’ केली आहेत.

वाहतूक पोलीस दिसले की, ‘यू टर्न’ घेणारे अनेक दुचाकीस्वार रस्त्यावर पहायला मिळतात. मात्र, शहरात कोणत्याही आडमार्गाने गेले तरी कधी ना कधी, कुठे ना कुठे ‘खाकी’ शी गाठ पडतेच. वाहन चालविण्याचा परवाना, ट्रीपल सिट, सिग्नल भंग यासह अन्य कारणास्तव त्यावेळी पोलीस कारवाई करतात. चालकाला दंडाच्या रकमेची पावतीही दिली जाते. दंड भरला की संबंधित चालक तेथून निघून जातो, असे आजपर्यंतचे समीकरण. मात्र, आता फक्त दंडात्मक कारवाईवर चालकांची सुटका होत नाही. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कऱ्हाडच्या पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत केवळ दंड न करता दंडासोबतच संबंधित चालकाचे ‘लायसन्स’ स्थगित करण्यात येत आहे. कऱ्हाडात गत साडेतीन वर्षात पाचशेहून जास्त चालकांची ‘लायसन्स’ अशाच पद्धतीने स्थगित करण्यात आली आहेत.

- चौकट

... अशी होते कारवाई

१) नियमभंग करणाऱ्या चालकावर सुरुवातीला दंडात्मक कारवाई केली जाते.

२) चालकाच्या ‘लायसन्स’ची आणि दंडाच्या पावतीची झेरॉक्स आरटीओकडे पाठविले जाते.

३) संबंधित चालकाचे लायसन्स स्थगित करण्याचा प्रस्तावही पाठविला जातो.

४) पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावावर कार्यवाही करुन आरटीओकडून लायसन्स स्थगित केले जाते.

- चौकट

सुरूवातीला तीन महिने, नंतर कायमस्वरूपी

वाहतूक पोलिसांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्रस्ताव पाठविल्यानंतर संबंधित चालकाचा परवाना सुरुवातीला तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात येतो. तसेच संबंधित चालकाने तोच नियमभंग वारंवार केल्यास कायमस्वरूपी परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिसांकडून पाठविला जातो.

- चौकट

...हे नियम मोडल्यास लायसन्स ‘सस्पेन्ड’

१) मद्यप्राशन करून वाहन चालविणे

२) सिग्नल भंग करुन निघून जाणे

३) मोबाईलवर बोलत वाहन चालविणे

४) मालाच्या वाहनातून प्रवासी वाहतूक

५) वेग मर्यादेचे उल्लंघन करणे

- चौकट

साडेतीन वर्षातील कारवाई

६५ : २०१८

१५२ : २०१९

२८८ : २०२०

१६ : २०२१

(ऑगस्ट २०२१ अखेर)

- कोट

अपघात टाळण्याच्या उद्देशाने ही मोहीम प्रेरित आहे. दंडात्मक कारवाईने नियमाबाबत भीती निर्माण होईल, अशी अपेक्षा असते. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नाही. अनेकजण अनेकवेळा दंड भरूनही नियमभंग करतात. त्यांचा हा नियमभंग अपघाताला कारणीभूत ठरतो. लायसन्स रद्द झाल्यास चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमाबाबत गांभीर्य निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.

- सरोजिनी पाटील

सहा. पोलीस निरीक्षक

वाहतूक शाखा कऱ्हाड

फोटो : ०८केआरडी०२, ०३

कॅप्शन : प्रतीकात्मक

Web Title: License 'suspended' for breach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.