वडिलांसोबत फिरायला गेलेल्या बालकाचे अपघाताने संपवले आयुष्य
By admin | Published: October 17, 2016 12:45 AM2016-10-17T00:45:55+5:302016-10-17T00:45:55+5:30
आईचा आक्रोश : सांबरवाडीतील बालकाचा अपघातात मृत्यू
सातारा : वडिलांसोबत दुचाकीवरून फिरायला जात असताना दुचाकी नाल्यात पडल्याने जखमी झालेल्या बालकाचा जागीच मृत्यू झाला. वडिलांसोबत फिरणे त्या बालकाचे अखेरचेच ठरले. विकास चंद्रकांत फडतरे (वय ४, रा. सांबरवाडी, ता. सातारा) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. हा अपघात रविवारी दुपारी चारच्या सुमारास सांबरवाडीजवळ झाला.
याबाबत जिल्हा रुग्णालयातील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विकास हा वडील चंद्र्रकांत फडतरे यांच्या समवेत रविवारी दुपारी चार वाजता दुचाकीवरून फिरण्यासाठी घराबाहेर पडला होता. सांबरवाडीपासून काही अंतरावर गेल्यानंतर चंद्रकांत फडतरे यांचा गाडीवरून अचानक ताबा सुटला. त्यामुळे गाडी नाल्यात जाऊन जोरदार आदळली. त्यामध्ये विकासच्या डोक्याला आणि हाताला पायाला गंभीर जखम झाली.
या अपघातानंतर फडतरे यांनी इतर नागरिकांच्या मदतीने विकासला नाल्यातून बाहेर काढून मिळेल त्या वाहनाने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासले असता उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
आपल्या मुलाचा अपघात झाल्याचे समजल्यानंतर विकासच्या आईने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली; परंतु मुलगा मृत झाल्याचे समजताच विकासच्या आईने हंबरडा फोडला. आईने केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असला तरी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. (प्रतिनिधी)