साताऱ्याच्या त्रिशंकू भागाला अखेर जीवदान !, हद्दवाढीमुळे सुटणार समस्यांचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 06:17 PM2020-09-19T18:17:58+5:302020-09-19T18:21:52+5:30
चार भिंतीपासून गोळीबार मैदानापर्यंत दक्षिण दिशेला तब्बल पाच किलोमीटर अंतराच्या परिघात पसरलेला त्रिशंकू परिसर मूलभूत सुविधांपासून आजही कोसोदूर आहे. या भागाचा सातारा शहराच्या हद्दवाढीत समावेश झाल्याने विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, स्थानिकांच्या आशाही आता पल्लवीत झाल्या आहेत.
सचिन काकडे
सातारा : चार भिंतीपासून गोळीबार मैदानापर्यंत दक्षिण दिशेला तब्बल पाच किलोमीटर अंतराच्या परिघात पसरलेला त्रिशंकू परिसर मूलभूत सुविधांपासून आजही कोसोदूर आहे. या भागाचा सातारा शहराच्या हद्दवाढीत समावेश झाल्याने विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, स्थानिकांच्या आशाही आता पल्लवीत झाल्या आहेत.
शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हा परिसर विस्तीर्ण आहे. गोडोलीच्या दक्षिणेकडे अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत हा परिसर पसरलेला आहे. शाहूनगरचा काही भाग हा विलासपूर ग्रामपंचायतीत आहे. तर काही भाग हा शहरात; परंतु जो भाग दोन्हीकडे नाही, तो त्रिशंकू भाग विकासकामांपासून वंचित राहिलेला आहे.
या परिसरात टुमदार बंगले आणि मोठाल्या अपार्टमेंट तयार झाल्या असल्या तरी रस्त्यावरची वीज, कॉलन्यांमधील रस्ते, गटार, कचरा वाहून नेण्याची यंत्रणा अद्याप या परिसरात पोहोचल्या नाहीत. हे लोक कर भरत नसल्याने पालिका अथवा जवळची ग्रामपंचायत त्यांना सुविधा देत नाही.
या त्रिशंकू भागाचा स्थानिक स्वराज्य संस्थेत सहभाग करुन घ्यावा आणि येथील रहिवाशांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून वारंवार केली जात होती. या मागणीला आता मूर्त रुप प्राप्त झाले आहे.
शासनाच्या नगरविकास विभागाने सातारा शहराच्या हद्दवाढीची अधिसूचना जाहीर केल्याने शहरासह उपनगर व त्रिशंकू भागाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. मोठी विकासकामे प्राधान्याने मार्गी लागतीलच; परंतु रस्ते, ओढे, गटारे, पाणी, वीज या मुलभूत सेवा प्राधान्यांने मार्गी लावणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.
या समस्या लागतील मार्गी
- रस्ते विकास, पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार, ओढ्यांचे रुंदीकरण
- घंटागाड्या, स्ट्रीट लाईट, घनकचरा निर्मूलन व सांडपाणी प्रकल्प
- सुसज्ज रुग्णालय, बालोद्यान, क्रींडागण विकास, झोपडपट्टी विकास
- खुल्या व सार्वजनिक जागांचा विकास, शॉपिंग सेंटर, रोजगार
- अजिंक्यतारा किल्ला हद्दवाढीत आल्याने पर्यटन विकासाला चालना
पालिकेच्या महसूलात वाढ
गेल्या काही वर्षांपासून त्रिशंकू भागात सातारा शहराचा विस्तार वाढत चालला आहे. या परिसरात मोठ्या मिळकती आहे, त्यांचा मिळकत कर कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला मिळत नाही. कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असताना या गंभीर विषयाकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही लक्ष नव्हते. हा भाग आता हद्दवाढीत आल्याने पालिकेच्या तिजोरीत कर रुपात मोठा महसूल जमा होणार आहे.
त्रिशंकू भागात येणारा परिसर
शाहूनगर, गोळीबार मैदान, आझाद नगर चौक, शिवनेरी कॉलनी, माधुरी कॉलनी, जगतापवाडी, चार भिंती परिसर, गोडोलीचा काही परिसर, विलासपूर ग्रामपंचायतीचा काही परिसर, करंजेचा काही परिसर, माजगावकर माळ, आकाशवाणी झोपडपट्टी
त्रिशंकू भाग हद्दवाढीत समाविष्ट झाल्याने विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. घंटागाडीपासून ते बांधकामापर्यंत निर्माण होणाऱ्या प्रत्येक अडचणी आता संपुुष्टात येतील. नागरिकांना पालिकेमार्फत सर्व सेवा-सुविधा जलद गतीने उपलब्ध होतील.
- शेखर मोरे-पाटील,
नगरसेवक