पत्नीचा खून करणाऱ्या डॉक्टरला जन्मठेप

By admin | Published: May 17, 2016 01:29 AM2016-05-17T01:29:21+5:302016-05-17T01:47:30+5:30

कऱ्हाड न्यायालयाचा निकाल : कौटुंबिक वादातून आवळला होता गळा

Life imprisoned doctor who murders wife | पत्नीचा खून करणाऱ्या डॉक्टरला जन्मठेप

पत्नीचा खून करणाऱ्या डॉक्टरला जन्मठेप

Next

कऱ्हाड : कौटुंबिक वादातून गर्भवती पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या डॉक्टरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. एम. आर. देशपांडे यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली. डॉ. महेश शामराव पवार (वय ३८, मूळ रा. पाल, ता. कऱ्हाड, सध्या रा. तारळे, ता. पाटण) असे आरोपीचे नाव आहे.
पाल येथील डॉ. महेश पवार याचा दि. ३ जून २००५ रोजी कुमठे येथील राजश्री यांच्याशी विवाह झाला. राजश्री यासुद्धा डॉक्टर होत्या. विवाहानंतर पाटण तालुक्यातील तारळे येथे डॉ. महेश व डॉ. राजश्री यांनी स्वतंत्र दोन रुग्णालये सुरू केली. त्यावेळी हे दाम्पत्य त्याचठिकाणी राहण्यास होते. कालांतराने राजश्री यांनी एका मुलीस जन्म दिला. त्या मुलीचे नाव सई ठेवण्यात आले. २००७ मध्ये राजश्री या पुन्हा गर्भवती राहिल्या.
दरम्यानच्या कालावधीत राजश्री व महेश यांच्यात कौटुंबिक वाद होत होता. अशातच दि. २० नोव्हेंबर २००७ रोजी पहाटे पाचच्या सुमारास डॉ. राजश्री यांना कऱ्हाडातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्या बेशुद्ध होत्या. बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्या जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच डॉ. राजश्री यांचा मृत्यू झाला.
डॉ. राजश्री यांचा गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदनानंतर स्पष्ट झाले. त्याबाबत मृत राजश्री यांचे वडील अर्जुन सावंत (रा. कुमठे, ता. कोरेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उंब्रज पोलिस ठाण्यात पवार याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक पी. के. पाटील यांनी याचा तपास करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र शहा यांनी काम पाहिले. त्यांनी १२ साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून न्या. एम. आर. देशपांडे यांनी डॉ. महेश पवारला जन्मठेप, तीन हजार रुपये दंड व दंड न दिल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

डॉक्टरचा बनाव अखेर उघड
डॉ. राजश्री या पाय घसरून पडल्याचे सांगण्यात आले होते. तसेच त्यावेळी ‘मी घरी नव्हतो, कऱ्हाडात होतो,’ असा बनावही पती डॉ. महेश पवारने केला होता. मात्र, त्याचा हा बनाव अखेर उघड झाला. राजश्री यांच्या शरीरावर कसल्याही जखमा नसल्याचे व त्यांच्या डोक्यालाही इजा झाली नसल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले.

Web Title: Life imprisoned doctor who murders wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.