मुलाचा खून करणाऱ्या पित्याला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 01:17 PM2021-05-06T13:17:53+5:302021-05-06T13:19:15+5:30
Court Satara : पती-पत्नीच्या कौटुंबिक कलहातून संतप्त झालेल्या पित्याने दारुच्या नशेत आठ वर्षाच्या मुलाला विष पाजून चिमुकल्याचा खून केल्याप्रकरणी जिल्हा प्रमुख न्यायाधीश आर.डी. सावंत यांनी पित्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दरम्यान, ही शिक्षा व्हिडीओ कान्फरन्सिंगवर सुनावण्यात आली.
सातारा: पती-पत्नीच्या कौटुंबिक कलहातून संतप्त झालेल्या पित्याने दारुच्या नशेत आठ वर्षाच्या मुलाला विष पाजून चिमुकल्याचा खून केल्याप्रकरणी जिल्हा प्रमुख न्यायाधीश आर.डी. सावंत यांनी पित्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दरम्यान, ही शिक्षा व्हिडीओ कान्फरन्सिंगवर सुनावण्यात आली. शिवराज संतोष भिंगारे (वय ८ वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे नाव असून संतोष लक्ष्मण भिंगारे (वय ३५, सध्या रा.पाचवड ता.वाई मूळ रा.कडेगाव जि.सांगली) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या पित्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संतोष भिंगारे व वैशाली भिंगारे यांना दोन मुले. दोघा पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणातून वारंवार वाद होत होता. यातूनच पत्नी दोन्ही मुलांसह माहेरी कडेगाव येथे राहत होती तर पती पाचवड येथे राहत होता. शिवराज हा कडेगाव येथील शाळेत जात होता. दि. ४ मार्च २०१७ रोजी आरोपी संतोष भिंगारे याने कडेगाव येथील शिवराजच्या शाळेत जावून त्याने जबरदस्तीने पळून नेले. यावेळी शाळेतील शिक्षकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही त्याने शिवराजला घेऊन पलायन केले.
संतोष याने मुलगा शिवराज याला भुईंज येथे आणले. तोपर्यंत शिक्षकांनी वैशाली भिंगारे यांना या घटनेची माहिती दिली. पतीने तुमच्या मुलाचा नेले आहे. पत्नी वैशाली यांनी या घटनेची माहिती कडेगाव पोलिसांना दिली. पित्याने मुलाला भुईंजमध्ये आणल्यानंतर त्याने मुलगा शिवराज याला विष पाजले व त्याने स्वत: पिवून फोन करुन तशी माहिती पत्नीला दिली. दरम्यान, दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . मात्र शिवराज याची प्रकृती चिंताजनक असतानाच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मुलाच्या मृत्यूनंतर भुईंज पोलिस ठाण्यात वैशाली भिंगारे यांनी खूनाची तक्रार दिली. भुईंज पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला. संतोष भिंगारेची प्रकृती चांगली झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने संतोष भिंगारे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्यावतीने अॅड. नितीन मुके यांनी काम पाहिले.