शेतीसाठी करावी लागताहेत जीवघेणी कामे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:37 AM2021-02-14T04:37:27+5:302021-02-14T04:37:27+5:30
बामणोली : या परिसरात असणारे मुबलक व प्रचंड मोठे असे ऐनाचे वृक्ष. या झाडाचा पाला शेंड्यापर्यंत सुमारे १५० फूट ...
बामणोली : या परिसरात असणारे मुबलक व प्रचंड मोठे असे ऐनाचे वृक्ष. या झाडाचा पाला शेंड्यापर्यंत सुमारे १५० फूट उंचीपर्यंत जाऊन जमा करत आहेत. हे मोठे धाडसी व जीवघेणे काम आहे. कारण कमरेला आकडीत कोयता ठेवून ऐनाच्या प्रचंड उंच शेंड्यापर्यंत जाऊन डहाळी तोडायची असते. पाय सुटून तोल जाऊन खाली पडले, तर मृत्यूच. यापूर्वी काही शेतकऱ्यांनी आपला जीवही गमावलेला आहे. परंतु या कामाशिवाय पर्याय नाही, असे शेतकरी सांगतात.
या शेतीच्या कामाला ‘कवळे’ बांधणी असे म्हणतात. हा जमा केलेला पाला होळीनंतर तरवा करून जाळतात व त्यावर भाताची रोपे तयार करतात. एवढ्या उंच ऐनाच्या झाडावर चढणे हे एक अतिकष्टाचे काम असते; परंतु बामणोली व तापोळा परिसरातील शेतकरी हे कष्टाचे काम वर्षानुवर्षे लिलया पार पाडत आहेत. या झाडाच्या डहाळीचा पाला गोळा करण्यात पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही, कारण याच डहाळीची पाने गळतीने उन्हाळ्यात गळून पडत असतात. डहाळी तोडल्याने झाडाला कोणतीही इजा पोहोचत नाही. ऐनाचे झाड उलट जास्त उंचीपर्यंत वाढत असते. त्याची कोणतीही फांदी तोडली जात नाही. शेतीला अशा कष्टाच्या कामाशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच हे शेतकरी म्हणतात. ‘आम्ही तापोळा बामणोलीचे शेतकरी, पर्वत झाडे लीलया सर करी..’
(कोट १)
भाताचे तरवे बनविण्यासाठी आम्हाला पालापाचोळा लागतो. म्हणून आम्ही शेताच्या बांधावर असणाऱ्या ऐनाच्या झाडाचा पाला गोळा करून त्याची कवळे बांधून ठेवतो व होळीनंतर भाताच्या खाचरात भाजणी करतो. भाजणी केली नाही, तर भाताचे रोप कसदार होत नाही. तण उगवते, कारण या जमिनीत विषाणूंचे प्रमाण जास्त आहे. ऐनाच्या झाडावर चढून कवळे करणे फार जीवघेणे काम असते. यामध्ये कुशल असणारे शेतकरीच झाडावर चढतात. पाला काढल्याने झाडाची वाढ अजिबात कमी होत नाही. भाजणी वावरात होणारी झाडाची पानगळती थांबते. आमचा हा पूर्वपारंपरिक चालत आलेला शेती व्यवसाय आहे.
- गोपाळ शिंदे, शेतकरी, म्हावशी
(कोट २)
बामणोली परिसरातील शेतकरी अनेक वर्षांपासून ऐन या झाडाचा पाला शेतीसाठी गोळा करतात. ही सर्व झाडे त्यांच्या वैयक्तिक मालकीची आहेत. पाला गोळा केल्याने पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही. कारण या झाडांची संपूर्ण पानगळती मार्च महिन्यापर्यंत होत असते. ऐन झाडांची पाने तोडल्याने झाडाची वाढ सरळपणे व चांगली होते.
- श्रीरंग शिंदे, वनपाल, बामणोली
फोटो आहे..
१३बामणोली
तापोळा परिसरातील शेतकरी जीव धोक्यात घालून ऐनाच्या झाडावर चढत डहाळी तोडत आहेत.