अंधकारमय वाटेवर ज्ञानाचा प्रकाश..!
By admin | Published: July 10, 2015 10:17 PM2015-07-10T22:17:39+5:302015-07-10T22:17:39+5:30
शिक्षणाचे द्वार खुले : शाळाबाह्य मुले वळणार आता ‘गमभन’कडे
खंडाळा : शाळाबाह्य मुले हा शैक्षणिक प्रगतीच्या मार्गातील मोठा अडथळा मानला जातो. म्हणून शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करून त्यांना वयानुरूप शिक्षणाची दारे उघडली गेली आहेत. त्यामुळे समाजातील गोरगरीब, फिरस्ती कुटुंबातील, भीक मागून उदरनिर्वाह करणारी मुले, कामगारांची मुले आता शाळेत जावू लागली आहेत. ती आता ‘गमभन’ शिकू लागली आहेत. जीवनाच्या अंध:कारमय वाटेवर ज्ञानाचा प्रकाश झळकल्याने या मुलांचे आयुष्य उज्वल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सातारा जिल्हा परिषदेने राज्य सरकारच्या धोरणानुसार ४ जुलै रोजी एकाचवेळी शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण केले. शाळेपासून वंचित असलेल्या ६ ते १४ वयोगटातील मुलांना शोधून त्यांची पाऊले शाळेच्या दिशेने वाटचाल करु लागली आहेत. गरिबांनी शिक्षणाच्या प्रवाहात आल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही. पण गरीब शिक्षणापर्यंत येऊ शकत नसतील तर शिक्षणाने त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. याच धोरणातून खंंडाळा तालुक्यात ही मोहीम यशस्वीरित्या राबविली गेली. त्यानुसार तालुक्यात एकूण ६२ मुले शाळाबाह्य आढळून आली. त्यांना आता शाळेत दाखल करुन प्रत्यक्ष शिक्षण देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.खंडाळा येथील प्राथमिक शाळेत यापैकी काही मुलांना प्रवेश देण्यात आला आहे. घरोघरी फिरणारी, रस्त्याकडेला खेळणारी ही मुले आता ‘गमभन’ अशी अक्षरे गिरवू लागली आहेत. या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत आहे. (प्रतिनिधी)
उपस्थिती टिकवणे मोठी समस्या...
आजपर्यंत शाळेच्या बाहेर वावरणारी ही मुले शाळेत दाखल झाली खरी, पण ती रोज शाळेत येणे व टिकणे मोठे कष्टाचे काम आहे. एकतर त्यांची कुटुंबे स्थलांतरित होत असतात. अथवा काही मुले भीक मागून उदरनिर्वाह करतात. त्यांच्यावर काही कुटुंबे अवलंबून असतात. त्यामुळे ही मुले शाळेत आल्याने पोटाचे काय असा प्रश्न उभा राहतो. वास्तविक या मुलांसाठी निवासी शाळांची सोय होणे गरजेचे आहे. कुटुंबांना स्थैर्य मिळेल असे काम मिळणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
खंडाळा तालुक्यात सर्व्हेक्षणाप्रमाणे आढळलेल्या शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. शाळाबाह्य मुलांचे शिकणे प्रभावी करण्यासाठी त्यांना येते ते जाणून घेऊन अभ्यासक्रमाच्या चौकटीत बांधण्याची, त्यांच्या ज्ञात बाजू समजावून घेण्याची गरज आहे. व्यावहारिक ज्ञानाला आपल्या शालेय प्रक्रियेत उपयोजित केल्यास ही मुले वेगाने शिकताना दिसतील.
-गजानन आडे,
प्रभारी गटशिक्षणाधिकारी, खंडाळा