प्रतापगडच्या इतिहासाला उजाळा : भवानीमातेच्या मंदिरास ३५८ वर्षे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 09:07 PM2018-10-13T21:07:19+5:302018-10-13T21:09:25+5:30
छत्रपती शिवरायांच्या देदीप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगड शुक्रवारी ३५८ मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. निमित्त होते ते प्रतापगडवासिनी श्री भवानीमातेच्या मंदिरास ३५८ वर्षे पूर्ण झाल्याचे.
महाबळेश्वर : छत्रपती शिवरायांच्या देदीप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगड शुक्रवारी ३५८ मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. निमित्त होते ते प्रतापगडवासिनी श्री भवानीमातेच्या मंदिरास ३५८ वर्षे पूर्ण झाल्याचे. नवरात्र उत्सवात चतुर्थीला राज्यभरातून हजारो शिवभक्तांनी प्रतापगडावर हजेरी लावून हा ‘मशाल महोत्सव’ याची देही याची डोळा अनुभवला.
चतुर्थीदिवशी भवानी मातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर रात्री आठच्या दरम्यान ढोल-ताशांच्या गजरात ‘जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या जयघोषात मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात
आली.
किल्ल्याच्या चहुबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तर भवानी माता मंदिर ते बुरुजापर्यंत लावण्यात आलेल्या मशालींमुळे गड व परिसर उजळून निघाला होता. दोन घटांची परंपरा आजही कायम किल्ले प्रतापगडावर नवरात्रीत दोन घट बसविले जातात. एक घट शिवाजी महाराजांच्या नावाने. कारण छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तर दुसरा घट हा राजाराम महाराज यांच्या नावाने. कारण त्यांनी स्वराज्याचा पाया मजबूत केला म्हणून. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू
आहे.
प्रतापगडवासिनी श्री भवानीमातेच्या मंदिरास नवरात्रौत्सवातील चतुर्थीला ३५८ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त शुक्रवारी किल्ल्यावर ३५८ मशाली प्रज्वलित करण्यात आल्या.