‘एलईडीं’च्या प्रकाशात उजळले कातरखटाव!
By admin | Published: October 15, 2015 10:49 PM2015-10-15T22:49:23+5:302015-10-16T00:58:33+5:30
सामाजिक बांधिलकी : सावली फाउंडेशनने लाखो रुपये खर्चून चौकाचौकात उभारले टॉवर -- गूड न्यूज
विठ्ठल नलवडे - कातरखटाव--शहरातील झगमगाट, रात्रीच्या वेळी पथदिव्यांच्या प्रकाशात उजळून निघालेले रस्ते, हे चित्र आपल्याही गावात निर्माण व्हावे, असे स्वप्न प्रत्येक गावकऱ्यांच्या मनात असतं. कातरखटाववासीयांच्या मनात असलेलं हे स्वप्न सत्यात उतरवलंय सावली फाउंडेशनने. संस्थेनं स्वखर्चातून १९ लाख रुपये खर्चून गावातील चौकाचौकात उभारलेल्या एलईडी पथदिव्यांमुळं अख्खं गाव प्रकाशानं उजळून निघालंय.गेल्या चाळीस वर्षांपासून अंधारमय असलेल्या कातरखटाव गावाला झळाळी देण्याचे काम येथील सावली सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व सरपंच तानाजी बागल यांनी विधायक कार्यातून केले आहे. कोणतेही सत्ता नसताना लाखो रूपये खर्चून विकासकाम मार्गी लावली आहेत. बसस्टॉप ते जानाई चौक या मार्गावर नव्याने बसविण्यात आलेले एलईडी दिवे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले असून कातरखटाव व परिसरातील लोकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. गेली पंधरा दिवस कातरखटाव मुख्य चौक, मारूती मंदिर, शिवाजी चौक, कुंभार चौक, जानाई चौक, मातंगवस्ती, मानेवाडी, तुपेवाडी येथे बसविण्यात आलेल्या पथदिव्यांमुळे कातरखटाव गावाला झळाळी मिळाली आहे. सर्वांना बरोबर घेऊन तानाजी बागल काम करत आहेत. गावाला बसस्टॉप कुठे आहे माहीत नव्हते. कातरखटाव, शिंगाडवाडी, रानमळा या बसथांब्यावर रखरखत्या उन्हात शाळेतील मुले, ज्येष्ठ नागरिकांना उभे रहायला जागा नव्हती. तिथे पिकअप शेड उभारण्यात आली.
संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. वाड्यावस्त्यावरील रस्त्याचे काम, तसेच आठवड्यातून एकदा दवाखान्याची गाडी सुरू करण्यात आली असून यामध्ये रूग्णासाठी मोफत उपचाराची सोय सावली संस्थेतर्फे करण्यात आली आहे.
गावातील जुन्या हातपंपावर नवीन पाईप वाढविण्यात आल्या असून आजूबाजूच्या खेड्यापाड्यात लाखो रूपयांची विकासकामे सावली फाउंडेशन संस्थेतर्फे मार्गी लावण्यात आली आहेत. संस्थेच्या सामाजिक कार्याचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
खटाव तालुक्यातील पहिलाच उपक्रम
एखाद्या गावात एलईडी पथदिवे बसविण्याचा तालुक्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. गावातील चौका-चौकात लावलेल्या पथदिव्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांची बालगोपाळांबरोबर वर्दळ वाढू लागली आहे. या पथदिव्यामुळे नागरिकांना एक वेगळी अनुभूती येत असून गावागावात, खेड्यापाड्यात पथदिव्याची जोरात चर्चा चालू आहे.
गावासाठी पदरमोड करणार
ज्याला खरच गावचा विकास करायचा आहे. त्याला सत्ताच हातात पाहिजे असे नाही. ज्यांना विकासच करायचा नाही, त्यांना पळवाटा भरपूर आहेत. माझ्याकडे सत्ता असो किंवा नसो, वेळ पडेल तिथे पदरमोड करून गावाचा विकास करणार.
- तानाजी बागल, सरपंच, कातरखटाव