विजेचा धक्का; शाळकरी मुलाचा मृत्यू

By admin | Published: June 28, 2015 11:40 PM2015-06-28T23:40:03+5:302015-06-28T23:40:03+5:30

नांदवळ येथील घटना : आंबे वेचताना झाला तारेला स्पर्श; कुटुंबावर शोककळा

Lightning; School child's death | विजेचा धक्का; शाळकरी मुलाचा मृत्यू

विजेचा धक्का; शाळकरी मुलाचा मृत्यू

Next

वाठार स्टेशन : मित्रांसोबत आंबे वेचण्यासाठी गेलेल्या शिवम दिनेश चौधरी (वय ११) या शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्याने दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी नांदवळ ता. कोरेगाव येथे घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, शिवम हा नांदवळ येथील जिल्हा परिषद शाळेत चौथी इयत्तेत शिकत होता. शनिवारी (दि. २७) दुपारी शाळा सुटल्यानंतर तो आपल्या मित्रांसमवेत गावाजवळ असणाऱ्या उफळी नावाच्या शिवारात आंबे व जांभूळ खाण्यासाठी गेला होता. त्याच शिवारात सदाशिव भोसले यांच्या शेतात असणाऱ्या वीज वाहक खांबाच्या आर्थिंगच्या तारेला शिवमचा हात लागला. आर्थिंगच्या तारेतून वीजप्रवाहक सुरू असल्यामुळे शिवमला जोरदार वीजेचा धक्का बसला. या धक्क्याने तो जागीच बेशुद्ध पडला. त्याच्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ व युवकांनी घटनस्थळी धाव घेतली. नागरिकांनी शिवमला पिंपोडे बुद्रक येथील खासगी रुग्णालयात तत्काळ दाखल केले. मात्र, तत्पुर्वीच
त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने शिवमच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून रविवारी (दि. २८) रोजी सकाळी १० वाजता शोकाकूल वातावरणात शिवमवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे नांदवळ गावावर शोककळा पसरली
आहे. (वार्ताहर)

महावितरणने झटकली जबाबदारी!
नांदवळ येथे शेतात असणाऱ्या वीजवाहक खांबाच्या आर्थिंग तारेला करंट कसा लागला? असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात असून महावितरणच्या गलथान कारभारामुळेच ही घटना घडल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. याबाबत विचारणा केल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणेच कानावर बोट ठेवून यात महावितरणचा दोष नसल्याचे सांगितले. दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास करून महावितरणकडून शिवमच्या कुटूंबास आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नांदवळ ग्रामस्थांनी केली आहे.

आवडता विद्यार्थी
शिवमच्या कुटुंबाची परिस्थिती हालाकीची आहे. त्याची आई नंदा मोलमजूरी करते. नांदवळ हे त्यांचे माहेर. सानिका, विशाल व शिवम या तीन मुलांमध्ये शिवम हा सर्वात धाकटा. तो शाळेत अत्यंत हुशार व शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता. त्याच्या मृत्यूनंतर शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी नंदा चौधरी यांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.

Web Title: Lightning; School child's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.