गटबाजीच्या चिखलात कमळ फुललं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:50 PM2017-10-18T23:50:19+5:302017-10-18T23:50:19+5:30

Lily blossom in a cluttering mud | गटबाजीच्या चिखलात कमळ फुललं

गटबाजीच्या चिखलात कमळ फुललं

Next



सागर गुजर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात नुकतीच पार पडलेली ग्रामपंचायत निवडणूक ही आगामी लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे. गावपातळीवरील राजकारणावर वरचष्मा ठेवून असलेल्या राष्ट्रवादीला आता प्रतिस्पर्ध्यांची संख्या वाढल्याचे दिसत असून, राष्ट्रवादीतील गटा-तटाचे राजकारण विरोधकांच्या पचनी पडत असल्याचेही चित्र समोर येत आहे.
राष्ट्रवादी अंतर्गत गटातटांत अडकली आहे. जातीयवादी पक्षांना थारा देणार नाही, असं म्हणणारी काँगे्रस विचित्र युतींच्या गुंत्यात गुंतली आहे. आणि या दोन्ही मोठ्या प्रस्थापित पक्षांमधून आयात केलेल्या नेत्यांच्या भरवशावर भाजप व शिवसेना वाटचाल करीत आहे. या परिस्थितीमुळे भलतेच राजकीय गढूळ वातावरण जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. या परिस्थितीत आगामी २०१९ मध्ये होणाºया लोकसभा निवडणुकीचे जुगाड नेतेमंडळी नेमके कशा पद्धतीने साधतात, याचा बोध ग्रामपंचायत निवडणुकीतून घ्यावा लागणार आहे.
लोकसभेच्या सातारा आणि माढा मतदारसंघांमध्ये कोण लढणार? याचे अंदाज राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत. सातारा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले यांना पर्याय उभा करायचा झाल्यास राजे वगळून राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी चाली खेळल्या आहेत. राष्ट्रवादीने ग्रामपंचायत निवडणुकीची व्यूहरचना करत असताना कोणाशी युती करायची? याचे आडाखे आधीच बांधले होते. साहजिकच काँगे्रस पहिल्या क्रमांकाचा शत्रू हे लक्षात घेऊन राष्ट्रवादीने या पक्षाशी युती करण्याचे टाळले आहे. काँगे्रसला जितके नामोहरम करता येईल, तितके आपले प्राबल्य वाढणार, हे गणित लक्षात घेऊन राष्ट्रवादीने सवता सुभा मांडला होता.
जिल्ह्यातील गावपातळीच्या राजकारणात राष्ट्रवादी सरस आहे, तसेच याच राजकारणात राष्ट्रवादी कायमच यशस्वी झाली असल्याने तब्बल १५ वर्षांपासून हा पक्ष जिल्ह्याच्या राजकारणावर मांड ठेवून आहे. केंद्रात व राज्यात सत्ता परिवर्तन झाले असले तरी गेल्या तीन वर्षांच्या काळात सातारा जिल्ह्यामध्ये भाजपला विशेष यश मिळणार नाही, याची खबरदारी राष्ट्रवादीने घेतली आहे. हे जरी खरे असले तरी राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवरील गटातटाच्या राजकारणाचा राष्ट्रवादीला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक गावांमध्ये प्रस्थापित नेतेमंडळी असतात आणि त्यांच्या कामकाजाला विरोध करणारेही. वर्षानुवर्षे आपणच ‘किंगमेकर’ अशा भ्रमात राहिलेल्या मंडळींना धडा शिकविण्याच्या उद्देशाने याच पक्षातील उभरत्या नेतृत्वांनी विरोधात पॅनेल उभे केले. त्याचा फटका प्रस्थापितांना बसला; पण भाजपनेही ठिकठिकाणी डोके वर काढले आहे.
राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामुळे राष्ट्रवादीचे कोणतेच नुकसान झाले नाही, उलट काँगे्रस पक्षाच्याच जागा कमी झाल्या. या बोलण्यात जरी तथ्य असले तरी अनेक ठिकाणी राष्ट्रवादीलाही भाजपमुळे फटका बसला आहे, हे निश्चितच आहे. खटाव तालुक्यातील मायणी, खंडाळ्यातील शिरवळ, असवली, वाई तालुक्यातील किकली, कवठे, पांडे, काळंगवाडी, कोरेगावातील खेड, पिंपोडे खुर्द हे तसे राष्ट्रवादीचे बालेकिल्ले मात्र याठिकाणी विरोधकांनी सुरुंग लावून सत्ता काबीज केली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत स्पर्धेत नसलेली भाजप आता जिल्ह्याच्या सारीपाटावर राष्ट्रवादीचा कट्टर विरोधक म्हणून समोर येत आहे. राष्ट्रवादी पक्षातून निवडून आलेले खासदार उदयनराजे भोसले यांचे जिल्ह्यातील राष्ट्रवादीशी सूत जुळत नाही. टोलनाक्याचे व्यवस्थापन बदलण्याच्या घडामोडीत ज्या बाबी समोर आल्या, त्यावरून तर लोकसभा निवडणुकीआधी उदयनराजेंची रसद तोडण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. राष्ट्रवादीमधीलच एखादे खमके नेतृत्व सातारा लोकसभा मतदारसंघात पुढे आणले जाणार आहे, हे सध्याच्या राजकीय वातावरणावरून स्पष्ट होते.
या परिस्थितीत राष्ट्रवादी विरोधी मंडळी खासदार उदयनराजे भोसले यांना बळ देऊ शकतात. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील युतींच्या जुगाडावरून तरी हेच समोर येत आहे. मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सातारा तालुक्यातील काँगे्रस हा पक्ष खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीमागे फरपटत गेला होता. साहजिकच, उदयनराजे हेच आपले नेते, अशी मानसिकता काँगे्रस नेत्यांमध्ये ठाम बनली होती. आता लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात सर्वपक्षीय जुगाड बांधले गेल्यास उदयनराजेंकडेच सर्व नेतेमंडळी आशेने पाहतील, असे दिसते.
राष्ट्रवादी विरोधात सर्व पक्षीय
जिल्ह्यातील २५६ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीविरोधात सर्व पक्षीय पॅनेल बांधले गेले होते, त्यातूनही राष्ट्रवादीला मोठे यश मिळालेले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ‘क्लीन स्वीप’ मिळविण्यासाठी राष्ट्रवादी धडपडणार आहे.

Web Title: Lily blossom in a cluttering mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.