गुणवत्ता सिद्ध करण्याची अमर्याद संधी व्यवसायातच
By admin | Published: January 14, 2016 10:10 PM2016-01-14T22:10:42+5:302016-01-15T00:17:33+5:30
बांधकामासाठी आवश्यक यंत्रांची निर्मिती : परदेशातही जातात अस्सल सातारी सिमेंट काँक्रिट मिक्सर
प्रगती जाधव-पाटील -- सातारा -सामान्य शासकीय नोकरदाराच्या घरात उद्योजक घडण्याचे प्रसंग अगदी बोटावर मोजण्याइतपतच असतात. पण गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अमर्याद संधी केवळ व्यवसायातच मिळू शकते, हे वाक्य मनाशी पक्कं करून प्रशांत बागल यांनी मशीन शॉप टाकून उद्योगाचा श्रीगणेशा केला. व्यवसायात आलेल्या अनुभवातून शिकत ते बांधकामासाठी आवश्यक सर्व प्रकारचे मशिन्स तयार करण्याच्या व्यवसायात स्थिर झाले. त्यांनी तयार केलेल्या या मशिन्स आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रीस जात आहेत.
काडणे, ता. पाटण गावचे प्रशांत हिंदुराव बागल वडिलांच्या नोकरीमुळे चाळीस वर्षांपूर्वी साताऱ्यात आले. महिन्याच्या महिन्याला येणारा सुरक्षित पगार अशाच वातावरणात मुलानेही शासकीय सेवा करावी, अशी पालकांची ‘टिपीकल’ अपेक्षा! पण वेगळं काही तरी करण्याच्या निश्चियाने प्रशांत बागल यांनी कंबर कसली. १९९५ मध्ये डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ही पदवी मिळविल्यानंतर त्यांनी सातारा औद्योगिक वसाहतीत नोकरी स्वीकारली. कितीही उत्कृष्ट काम केले तरीही मालकांच्या पसंतीस उतरले नाही तर काम केराच्या टोपलीत! हा त्यांचा क्लेषकारक अनुभव. दोन ठिकाणी नोकरी केल्यानंतर ‘लोकांसाठी’ काम करण्यापेक्षा ‘लोकांसह’ काम करण्याची संकल्पना त्यांनी रुजविली.
घरातून अपेक्षित विरोध झाल्यानंतर त्यांच्या व्यवसायाची सुरुवात झाली. चार मशिन्स घेऊन त्यांनी मशीन शॉप टाकले. आर्थिक मंदीच्या तडाख्यात व्यवसाय आला. त्यानंतर लिथ मशीन आणि औद्योगिक फॅब्रिकेशनचे मार्गही त्यांनी चोखाळले; पण अपेक्षित यश आले नाही. व्यवसाय बदलण्याचा विचार सुरू असतानाच त्यांना बांधकामासाठी आवश्यक असणारी मशिन्स तयार करण्याचा व्यवसाय ‘क्लिक’ झाला. काँक्रिट मिक्सर, वाळू चाळण मशीन, धुमस मशीन, मिनी लिफ्ट, टॉवर हाईटस्, ब्रिक मशीन, पेवर मशीन, ब्लॉक मशीन तयार करण्याची यंत्रसामूग्री आणून व्यवसायाला सुरुवात केली. सातारा जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात याला चांगली मागणी आहे. त्यांनी तयार केलेले सिमेंट काँक्रिट मिक्सर अफ्रिकेच्या बाजारपेठेत पोहोचलेत.
‘व्यवसाय सुरू केल्यानंतर अनेक स्थित्यंतरांचा अनुभव आला. यातून शिकत मार्गक्रमण करताना हा व्यवसाय निवडला. सातारा औद्योगिक वसाहतीने चांगलाच आधार दिला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काम करताना गुणवत्ता आणि उत्कृष्टता हे दोनच नियम असतात, हे अनुभवातून शिकता आले.
प्रशांत बागल,
सृष्टी इंजिनियरिंग, सातारा