बंद शटरच्या आतूनही दारूच्या बाटल्यांचा प्रवास..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:38 AM2021-04-27T04:38:44+5:302021-04-27T04:38:44+5:30
ढेबेवाडी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन कडक पावले उचलत आहे. प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला ...
ढेबेवाडी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन कडक पावले उचलत आहे. प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे. मात्र, तळमावले येथील काही मुजोर दारू विक्रेत्यांकडून सर्रास दारूविक्री केली जात आहे. उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यंत्रणेला मुख्य रस्त्याच्या बाजूला परमीट रूमवाल्याचा चाललेला हा लपाछपीचा खेळ दिसत नाही का? असा संतप्त सवाल तळमावले येथील सीताई फाैंडेशनने केला आहे. शटर बंद करून दारूच्या बाटल्यांना फुटलेले पाय कोणाच्या आधारावर उभे आहेत, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागासमोर ठाकले आहे.
पाटण तालुक्यातील तळमावले हे मध्यवर्ती ठिकाण. अलीकडे या बाजारपेठेने अचानक उसळी मारल्याने आणि व्यापारी बाजारपेठेने बाळसं धरल्याने तळमावले बाजारपेठेकडे व्यापाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले. शिक्षणासह सहकार आणि व्यापाराने समृध्द बनलेल्या या बाजारपेठेतच दारूवाल्यांनीही अगदी कायदेशीर परवाना काढून मुख्य रस्त्याकडेलाच आपली दुकाने थाटली. मात्र दारूविक्रीचा कायदेशीर परवाना असला तरी, बेकायदेशीर मार्गाने म्हणजेच गावोगावी आणि वाड्या-वस्त्यांमध्ये यांनी आपली पिलावळ निर्माण केल्याचे चित्र आहे.
उत्पादन शुल्क विभागाने परवाना देताना घालून दिलेल्या अटी आणि शर्ती हप्त्यात गुंडाळून, हम करेसो कायदा हे समीकरण बनवून येथील काही परमीट रूमधारक आणि शॉपीवाल्यांनी सर्रास गावोगावी आणि वाड्या-वस्त्यांमध्ये आपले पाय पसरले आहेत. कडक लॉकडाऊन असो, की संचारबंदी असो, या परमीट रूमच्या सभोवती नेहमीच बेकायदेशीर किरकोळ विक्रेते, दारूडे आणि पोलिसांवर नजर ठेवण्यासाठी रोजावर ठेवलेल्या पहारेकऱ्यांचा नेहमीच मुक्तसंचार असतो.
दरम्यान, जवळपास दोन वर्षांपासून येथील सीताई फाैंडेशनच्या अध्यक्षा कविता कचरे यांनी भर बाजारपेठेत असलेल्या या विक्रेत्यांविरोधात शेकडो महिलांसह लढाही उभारला. आडवी बाटलीसाठी मतदानही घेण्यात आले. मात्र त्यांच्या या लढ्याला अपयश आले आणि पुन्हा बाटली उभीच राहिली. यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या या विक्रेत्यांना ना पोलिसांचे, ना उत्पादन शुल्कचे भय राहिले. यामुळेच तर जिल्हाधिकाऱ्यांनी शटर बंदचे आदेश देऊनही मागच्या दरवाजाने बाटल्यांना पाय फुटल्याने येथून आजुबाजूच्या परिसरात अगदी किराणा मालाच्या दुकानातही चपटीने जागा घेतली आहे.
तळमावले बाजारपेठेत बंदोबस्त आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि दक्षतेसाठी पोलिसांसह होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्यांचाही येथून नेहमीच वावर असतो. तरीही दारूची विक्री होतच असल्याने, नेमके यामागचे गौडबंगाल काय? याचा शोध ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान, संचारबंदीतही आठ दिवसांपूर्वी मान्याचीवाडी (कुंभारगाव) येथे उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून तब्बल बारा बॉक्स दारू ताब्यात घेतली होती. मात्र, तो आरोपी कोण, एवढी दारू आली कुठून, याचा तपासही गुलदस्त्यात असल्याने उत्पादन शुल्क विभागही संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे स्पष्ट होते.
(कोट..)
दारूविरोधी आमचा लढा अखंडपणे चालूच राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेशही पायदळी तुडवत बेकायदेशीरपणे दारूविक्री केली जात असून, त्याचे चित्रीकरणही आम्ही केले. लवकरच ते जिल्हाधिकारी यांना पाठवणार आहे. बंद शटरच्या आडून खिडकीतून चाललेली विक्री आता कॉमेराबद्ध झाली आहे.
- कविता कचरे, अध्यक्षा, सीताई फाैैंडेशन, तळमावले