राष्ट्रवादीची यादी सहा तारखेला जाहीर
By admin | Published: February 4, 2017 12:08 AM2017-02-04T00:08:32+5:302017-02-04T00:08:32+5:30
जिल्हा बँकेत खलबते : बंडखोरी रोखण्यासाठी पक्षाचे सावध धोरण; बैठकीत विविध विषयांवर चर्चा
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचे शुक्रवारी जिल्हा बँकेत दिवसभर खलबते झाले. बंडखोरीचे दुखणे वाढू नये, यासाठी राष्ट्रवादीने सावध पवित्रा घेत उमेदवारांची यादी सहा तारखेला अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी जाहीर करण्याचे निश्चित केले आहे.
राष्ट्रवादीतर्फे ७८० इतक्या इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात चौरंगी काही ठिकाणी पंचरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीतील नाराज मंडळी भाजपच्या ताफ्यात सामील झाली आहेत. काही प्रमुख मंडळींनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला असल्याने पक्षाने अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत.
दरम्यान, शुक्रवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादीचे सर्व नेते मंडळी जमले होते. सकाळपासूनच विविध तालुक्यांतील इच्छुक कार्यकर्ते पदाधिकारी बँकेत हजर होते. पाटण, खंडाळा, वाई, कऱ्हाड या तालुक्यांतील राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हाध्यक्ष सुनील
माने, जिल्हा बँकेचे संचालक
माजी आमदार प्रभाकर घार्गे, नितीन पाटील, दादाराजे खर्डेकर, जितेंद्र पवार, संजय देसाई तसेच विविध तालुक्यांतील पदाधिकारी बँकेत हजर होते.
सर्वजण विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची वाट पाहत होते. पावणेचार वाजता रामराजे बँकेत दाखल झाले. त्याचवेळी ज्येष्ठ नेते माजी खासदार लक्ष्मणराव पाटील बँकेत दाखल झाले. रामराजे आल्यानंतर सर्वजण जिल्हा बँकेच्या मीटिंग हॉलच्या आत असणाऱ्या अँटिचेंबरमध्ये सर्वजण गेले.
लक्ष्मणराव पाटील यांनी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्याकडून जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती विषयी चर्चा केली. त्यानंतर ते दोघेही अँटिचेंबरमध्ये गेले. राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे. संपूर्ण जिल्ह्यावर १९९९ पासून राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व आहे. हे वर्चस्व
मोडून काढण्यासाठी विरोधकांचे डावपेच सुरू आहेत. अनेकांना पक्षप्रवेश देऊन त्यांच्या खेळ्या सुरू आहेत. त्यातच पक्षाशी प्रमाणिक राहणारे तसेच कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे उमेदवार निवडायचे आहेत, त्यामुळे अत्यंत सावधपणे उमेदवार निवडावे लागतील, असे मत अनेक नेत्यांनी या बैठकीत मांडले. विधान परिषदेला जो फटका बसला त्याची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये, याचा विचार करून उमेदवार निवडले जावेत, अशी इच्छा रामराजे व लक्ष्मणराव पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी यावेळी व्यक्त केल्याचे समजते. उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. (प्रतिनिधी)