ऐका दाजिबा..
By admin | Published: October 5, 2014 09:19 PM2014-10-05T21:19:49+5:302014-10-05T23:02:57+5:30
आधी प्रचार चिन्हाचा!
‘प्रचाराचं वारं कधी शांत होतंया कुणास ठावं. कार्यकर्ते रातच्यालाबी डोळ्याला डोळा लागू दिनात. जरा पाठ टेकली की कडी वाजलीच म्हणून समजा. आयला झोपंचं पार खोबरं करून टाकलंया ह्या इलिक्शानानं. देणं ना घेणं आन् नुसतंच कंदिल लावून येणं काय कामाचं.’ डोळं चोळत सदा बडबडला.
‘हे खरं दुखणं हाय तर तुझं. आरं इलिक्शान म्हणलं की दिवाळी आसतीया कार्यकर्त्यांची! पण तू घर सोडशील तर खरं. आसल माझा हरी तर देईल खटल्यावरी आसं म्हणण्यात काय हाशील! आरं, तुझ्यासारख्या चार बुकं शिकलेल्या कार्यकर्त्यांची आता खरी गरज हाय उमीदवारास्नी!’ नारू म्हणाला.
‘काय म्हंतोस काय?’ सदानं विचारलं.
‘आरं, यंदा उमीदवारांनी ह्या झाडावरनं त्या झाडावर उड्या मारल्यात. चिन्हं बदलल्यामुळं मतदारबी बुचकळ्यात पडल्यात. परवा तर गंमतच झाली. एका प्रचार रॅलीत मतदार उमीदवाराला म्हणाले, ‘सायब, आमच्या वार्डात प्रचार करायची कायबी गरज नाय. आमी तुमच्याच मागं हाय. गेल्या टायमाचा ‘बाण’ हाय आमच्या ध्यानात. तवा काळजी करू नका. यंदा ‘बाण’ बगा सगळ्याच्या फुडं कसा पळतूया ते.’ हे ऐकून ‘कमळा’ला झेंडू फुटला अक्षरश:! दाजिबा खोचकपणे बोलला.
‘खरंय. यंदा उमीदवारांचं पीक लय जोमात आलंय. कोण कुठल्या पार्टीचा, कुणाचं कुठलं चिन्ह हेच मतदारांस्नी कळायला मार्ग नाय. त्यामुळं उमीदवारांच्या शिट्ट्या गुल झाल्यात. हे चिन्ह काय ठिक नाय म्हणून आपलं ‘चिन्ह’ मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी शिकलेल्या कार्यकर्त्यांची भरती सुरू केलीया म्हणं उमीदवारांनी! ह्याला म्हणायचं आधी लगीन चिन्हाचं मग उमीदवाराचं!’ नारू म्हणाला.
‘तरी म्हणलं पदयात्रा काढण्याआगुदर कार्यकर्ते फटाके वाजवून, चिन्हाचं झेंडं फडकावून दवंडी का पिटत्यात. आता आलं लक्षात. आरं, उमीदवाराची जनतेत शोभा व्हण्यापरास आधी चिन्हाचा प्रचार करत्यात कार्यकर्ते.’ शिरपानं सांगितलं.
आरं पन् निवडून आल्यावर अशीच काळजी जनतेची घेतली तर बरं. तिकडं मंगळानं यानाला मायेनं आपल्या कुशीत घेतलं; पन् इकासाच्या नावानं बाँब आन् जनतेला मारलीया टांग, असं धोरण आसलं तर यानानं मंगळाला घिरट्या घालाव्या तशा घिरट्या उमीदवारास्नी माराव्या लागतील मतदारांच्या घराभवतंनं!’ दाजिबानं शालजोडी मारली.
‘चला, म्हंजी लगीन कुणाचं का लागंना सुशिक्षित कार्यकर्त्यांनी हे सुगीचे दिवस समजून डाव साधला पायजे. दिवाळी तोंडावर आलीय सिझन मारला नाय तर दिवाळं निघायचं! चला, उचला झेंडं, पताका आन् व्हा सामिल कार्यकर्त्यांच्या गर्दीत घोषणाबाजी करत! नारूनं चर्चेला पूर्णविराम
दिला.
प्रदीप यादव