माणसांच्या जंगलात छोटे हत्ती सुसाट!

By admin | Published: February 2, 2015 09:58 PM2015-02-02T21:58:32+5:302015-02-02T23:58:31+5:30

धोका ‘आ’ वासून : थोडेसे भाडे वाचविण्यासाठी पादचारी, वाहनचालकांच्या जिवाशी खेळ

Little elephant is happy in the forest of man! | माणसांच्या जंगलात छोटे हत्ती सुसाट!

माणसांच्या जंगलात छोटे हत्ती सुसाट!

Next

सातारा : काहीतरी अघटित घडल्याखेरीज नियमांचे पालन आणि अंमलबजावणी होतच नाही, असा अनुभव असलेल्या माणसांच्या जंगलात सध्या छोटे हत्ती धोकादायकरीत्या फिरत आहेत. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक लांबीचे साहित्य छोट्याशा टेम्पोमध्ये खचाखच भरून भाडे वाचविले जात आहे. मात्र, त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांच्या जिवाला मोठा धोका उद््भवू शकतो, हे संबंधितांच्या गावीही नाही. ‘छोटा हत्ती’ नावाने ओळखले जाणारे टेम्पो मोठ्या संख्येने बाजारपेठेत दाखल झाल्यावर मालवाहतूक सोपी आणि स्वस्त झाली. मात्र, लोखंडी गज, गर्डर, पाइप, बांबू अशा टेम्पोच्या तुलनेत कितीतरी लांबीच्या वस्तूंची वाहतूक याच टेम्पोमधून केली जाऊ लागली. वाहनातून आठ, दहा... कधी तर बारा-पंधरा फूट हे साहित्य बाहेर लटकत असते. गाडीच्या धक्क्यांनी ते लपकत असते. भरगर्दीच्या रस्त्यावरून अशी धोकादायक वाहतूक सुरू असताना ती रोखण्यात यंत्रणेलाही अपयश आल्याचे दिसते.चारचाकी ‘छोटे हत्ती’ आकाराने टेम्पोपेक्षा कितीतरी मोठ्या साहित्याची वाहतूक करू लागल्यानंतर तीनचाकी मालवाहू रिक्षाचालकांचेही धाडस वाढले आहे. छोटा हत्ती उपलब्ध नसेल, अशा ठिकाणी या तीनचाकी रिक्षांमधून असे साहित्य लादले जात आहे. वाहनाच्या पुढून आणि मागूनही साहित्य बाहेर आलेले असते. त्यामुळे चालकाने गर्दीतून वाट काढताना अंदाज कसा घ्यायचा, हा प्रश्नच आहे. एखादा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, हा त्याहूनही गहन प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची जबाबदारी ज्याप्रमाणे परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलिसांवर आहे, तशीच ती छोटे टेम्पो भाड्याने घेणाऱ्यांवरही आहे. छोट्या टेम्पोंची केवळ लांबी-रुंदीच नव्हे, तर उंचीही मोठ्या टेम्पोपेक्षा कमी असते. बाहेर लटकत असलेले साहित्य खड्ड्यांमुळे लपकत असताना दुचाकीस्वारांच्या थेट चेहऱ्याच्या उंचीपर्यंत ते खाली आलेले असते. अनेकदा धोक्यासाठी लाल कापडही साहित्याच्या शेवटच्या टोकाला बांधलेले नसते. वळणावरून टेम्पो वळविताना अंदाज आला नाही, तर मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे केवळ वाचणाऱ्या भाडेखर्चाकडे पाहायचे की सुरक्षित वाहन निवडायचे, यापैकी योग्य पर्याय विवेकानेच निवडावा लागणार आहे. (प्रतिनिधी)

वाहनातून बाहेर डोकावेल, अशा साहित्याची वाहतूक करण्यास परवानगी नाही. तथापि, अशी वाहतूक करताना आढळल्यास आकारण्यात येणारा दंड अत्यल्प असल्यामुळे अशी वाहतूक दिवसेंदिवस वाढतेच आहे. ही वाहतूक धोकादायक असून, नागरिकांनी ती टाळावी. विशेषत: व्यापाऱ्यांनी आपल्या मालाची ने-आण करण्यासाठी योग्य आणि सुरक्षित वाहन निवडावे. व्यवसायापेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे.
- संजय राऊत,  -उपप्रादेशिक परिवहन अधिकारी


गेल्या काही दिवसांत अशा प्रकारची धोकादायक वाहतूक केल्याबद्दल असंख्य कारवाया करण्यात आल्या आहेत. तथापि, कारवाईची वाट न पाहता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. अपघात झाल्यास संबंधित व्यक्ती अडचणीत सापडू शकते. वाहतूक शाखेतर्फे यापुढे अशा वाहतुकीविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.
- गणेश कानुगडे,  -सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

तपशीलछोटा टेम्पोमोठा टेम्पो --लांबी८ फूट१५ फूट -रुंदीसाडेचार ते ५ फूट६ फूट -स्थानिक भाडे१५० ते ३०० रु.५०० ते १००० रु.

नियम काय सांगतो? --वाहनांमधून बाहेर लटकत असलेल्या सळया, गर्डर्स यामुळे २०११ या एकाच वर्षात देशभरात ११ ते १२ हजार लोकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. या आकडेवारीनुसार सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने वाहनातून साहित्य बाहेर येऊ देता कामा नये, असा निकाल दिला आहे. तत्पूर्वी, वाहनातून १.८ मीटर साहित्य बाहेर आले, तर चालत असे. आता तेही चालत नाही. अशा स्थितीत भरशहरातून अशी वाहतूक सुरू असताना अपघात झाल्यास संबंधिताला मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. साहित्याची लांबी आणि उपलब्ध वाहने लक्षात घेता यंत्रणेकडून ही वाहतूक फारशी गांभीर्याने घेतली जात नाही; मात्र छोट्या हत्तींच्या आगमनाने वाहनाची लांबी आणि साहित्याची लांबी यातील अंतर वाढल्याने धोका अनेक पटींनी वाढला आहे.

Web Title: Little elephant is happy in the forest of man!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.