छोटे मासे गळाला; पण मोठ्यांचं काय ?
By Admin | Published: July 19, 2016 10:58 PM2016-07-19T22:58:45+5:302016-07-19T23:52:56+5:30
पुरवठा शाखा लाच प्रकरण : शासकीय कार्यालय परिसरात ‘हप्तेगिरी’ची चर्चा; कारवाईच्या भीतीने अनेकांचा सावध पवित्रा
कऱ्हाड : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे दोन कर्मचारी नुकतेच लाचप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. पण, त्यामुळे येथील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याने छोटे मासे गळाला तर लागलेच; पण मोठ्यांचं काय! अशी चर्चाही सुरू झाली आहे.
तालुक्यातील महसूल विभाग या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. अलीकडील काही उदाहरणे पाहायचे म्हटले तर पोलिस पाटील भरती प्रक्रिया, अनधिकृत वाळूउपसा प्रकरण. एकदम ताजे उदाहरण म्हणजे तहसीलदार कार्यालयातील पुरवठा निरीक्षक भरत गुरव ऊर्फ पुजारी व विजय घोडके या दोघांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले; पण हे झाले एका पुरवठा विभागाचे. इतर विभागांमध्येही सारं काही आलबेल आहे, असं नाही.
बेकायदेशीर वाळूउपसा तर इथल्या कर्मचाऱ्यांचे चांगले खुराकच म्हणून तर प्रत्येक ठेकेदार येथे जणू सिद्धी ‘विनायक’ लाच भेटायचा. सैदापूरचा जावई असणाऱ्या या व्यक्तीचा थाट लय मोठा. आता फारच चर्चा व्हायला लागल्यावर टेबल बदलण्याचं काम तहसीलदारांनी केलंय खर; पण हा श्री विनायक प्रसन्न झाल्याशिवाय अजूनही वाळूचा इकडचा कण जिकडं होत नाही, अशी चर्चा आहे.
प्रत्येक विभागात टेबलावरून अन् टेबला खालून राजरोस व्यवहार ठरलेले आहे. हे सगळं धाडसाचं काम छोटे मासे करीत असले तरी त्यातील ठरलेली रक्कम मोठ्या माशांनाही पोहोच केली जात असल्याची चर्चा आहे. पण अडचणीत येतात ते छोटे मासेच.
कऱ्हाड तालुका हा जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका ! त्यामुळे इथे महसूल विभागाचा पसारा मोठा आहे. त्यामुळे येथे काम करण्याची संधी मिळावी म्हणून अधिकारीही फिल्डिंग लावून असतात. त्याचं कारण काय हे सांगण्याची गरज नाही.
थोडक्यात येथील महसूल प्रशासन सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. इथं सारं असंच चालत असं तालुक्यातील जनता बोलू लागली आहे; पण या साऱ्याचा परिणाम गेंड्याची कातडी पांघरलेल्यांवर होणार का ? महसूल विभागाचा कारभार भ्रष्टाचार मुक्त होणार का ? हे प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहेत. (प्रतिनिधी)
‘पुरवठा’ कडून अन्याय तर तहसीलदारांचे दुर्लक्ष
पुरवठा विभाग व रेशन धान्य दुकानदार यांच्याकडून धान्यपुरवठा बंद करण्यात आल्याने त्याबाबत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तुळसण (ता. कऱ्हाड) येथील मारुती रामचंद्र वीर यांनी महिन्याभरापूर्वी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, या अन्यायाबाबत पुरवठा विभागातील अधिकारी व धान्य दुकानदारावर दीड महिना उलटून गेला तरी अद्याप कारवाई झाली नसल्याची माहिती निवेदनाद्वारे मारुती वीर यांनी दिली आहे.
महिनाभरातील चारजणांवर कारवाई
लाच मागणीबाबत महिनाभरात दोन प्रकरणे कऱ्हाडला घडली आहेत. त्यामध्ये एक म्हणजे शिवाजी शिक्षण संस्थेचे वरिष्ठ लिपिक परशुराम डवरी व कनिष्ठ लिपिक अर्जुन लकेसर आणि कऱ्हाड येथील रेशनिंग धान्य पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षक भरत गुरव ऊर्फ पुजारी व विजय घोडके अशा चौघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे.