लाईव्ह प्राणी दर्शनाचा थरार..! मचाण निसर्ग अनुभव : पुणे, बेंगलोरहून पर्यटकांची हजेरी,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:45 AM2019-05-18T00:45:57+5:302019-05-18T00:46:34+5:30
किर्रर्र झाडी असलेल्या वनक्षेत्रात उंच झाडावर बांधलेल्या मचाणीवर बसून लाईव्ह प्राणी दर्शन घेण्याचा आनंद निसर्ग पर्यटक बौद्ध पौर्णिमेच्यानिमित्ताने घेणार आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी यांनी यासाठी जय्यत तयारी केली आहे.
प्रगती जाधव-पाटील।
सातारा : किर्रर्र झाडी असलेल्या वनक्षेत्रात उंच झाडावर बांधलेल्या मचाणीवर बसून लाईव्ह प्राणी दर्शन घेण्याचा आनंद निसर्ग पर्यटक बौद्ध पौर्णिमेच्यानिमित्ताने घेणार आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी यांनी यासाठी जय्यत तयारी केली आहे.
नाशिक येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बलप्रमुख यांच्या आदेशानुसार बौद्ध पौर्णिमेच्यादिवशी सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये बौद्ध पौर्णिमेनिमित्त मचाण निसर्ग अनुभवाचे आयोजन सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या उपसंचालक डॉ. विनिता व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या निसर्ग अनुभवासाठी साताऱ्यासह पुणे, बेंगलोर, मुंबई येथूनही पर्यटक दाखल होणार आहेत.
सह्याद्री व्याघ्र राखीव पश्चिम घाटात पसरलेला आहे. त्यात सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी या जिल्ह्यांतील राखीव वन क्षेत्रांचा समावेश आहे. हे क्षेत्र सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असल्यामुळे दुर्गम व चढ-उताराचे आव्हानात्मक आहे. १८ व १९ मे रोजी या मचाण निसर्ग अनुभव घेण्यासाठी विविध पाणवठ्यांवर तात्पुरत्या स्वरुपाचे मचाण बांधण्यात आले आहे.
प्रत्यक्षात मचाण निसर्ग अनुभवास जाण्यापूर्वी स्वंयसेवक व प्रशिक्षणार्थी वनक्षेत्रपाल यांना वनपरिक्षेत्र कार्यालयात मचाण निसर्गानुभवाबाबत मार्गदर्श करण्यात येणार आहे. १८ मे रोजी दुपारी चार वाजता स्वयंसेवक व वन कर्मचारी मचाणावर बसतील तर दुसºया दिवशी सकाळी नऊपर्यंत बाहेर येतील.
दरम्यान, निसर्ग पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना येथून आठवण म्हणून काही वस्तू नेण्याची सोयही यंदा पहिल्यादांच करण्यात आली आहे. यांतर्गत सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या वतीने टीशर्ट, टोपी, की चेन, पुस्तके आदी गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
गॅझेटशिवाय स्वत:ला अनुभवण्याची संधी
निसर्गात रमायचं असेल तर त्यात एकरूप व्हावे लागते. अलीकडे आधुनिक गॅझेटमुळे असं एकरूप होणं विस्मृतीत जायला लागलंय. मात्र, या निसर्गानुभवात मोबाईल गॅझेट लांब ठेवून प्राण्यांच्या हालचाली अनुभवण्याचा आनंद घेता येणार आहे. यानिमित्ताने गॅझेटशिवाय स्वत:ला अनुभवण्याची संधीही मिळणार आहे.
41 मचाणी 82 स्वयंसेवक 82 वन कर्मचारी.
मचाणावर बसून वन्यप्राणी बघण्याचा अनुभव थरारक आणि चिरकाल स्मृतीत राहणारा आहे. वन्यसंहिता सांभाळून येथे येणारे पर्यटक वन्यजीव पाहण्याचा आनंद घेणार आहेत. यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
- डॉ. विनिता व्यास, उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प