व्यावसायिकांचा जीव मेटाकुटीला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:28 AM2021-05-29T04:28:14+5:302021-05-29T04:28:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण जगाची घडी विस्कटली असून, दैनंदिन जीवन जगणेही कठीण होऊन बसले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण जगाची घडी विस्कटली असून, दैनंदिन जीवन जगणेही कठीण होऊन बसले आहे. या काळात सर्व व्यापारी व व्यावसायिकांचा जीव मेटाकुटीला आला असून, यावर पर्यायी तोडगा काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. भरमसाठ वीजबिल व व्यवसाय नसल्यामुळे थकलेले गाळा भाडे आणि घरमालकांचा सुरू असलेला भाड्यासाठीचा तगादा याने व्यावसायिक अक्षरशः हवालदिल झाले आहेत.
‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणीप्रमाणे सध्या व्यापाऱ्यांची अवस्था झाली आहे. लाॅकडाऊन काळात किराणा माल व भाजी मंडई व्यतिरिक्त खरेदीसाठी कोणतेही नागरिक रस्त्यावर फिरताना आढळून येत नाहीत. गरजा कमी करून पैशांची बचत हाच मूलतंत्र सध्या सुरू असल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे. हौस व मौजमजा करण्याचे हे दिवस नसल्याचे अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. या व अनेक कारणांमुळे बाजारपेठ ठप्प झाली असून, व्यापारी व छोटे-मोठे व्यावसायिक अनंत अडचणींना सध्या सामोरे जात आहेत. त्यात भरीस भर म्हणून म्हणून घरमालकाने भाड्यासाठी लावलेला तगादा आणि थकलेले वीजबिल यामुळे व्यापारी प्रचंड तणावाखाली आहेत. यावर तातडीने मध्य साधून मार्ग काढण्याची भूमिका संबंधित प्रशासनाने घ्यावी, अशी आग्रही व कळकळीची मागणी व्यापाऱ्यांमधून होत आहे.
वृत्तपत्र विक्रेत्यांचीही अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. एस. टी. बसेस सुरू आहेत, मात्र प्रवासी नाहीत. त्यामुळे संबंधित भाडेकरूंना भाडे कमी अथवा माफ होऊ शकत नाही, असा तोंडी खुलासा संबंधित विभागाकडून दिला जात आहे. प्रामुख्याने हार, फुले विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, मंडपवाले, कापड व्यावसायिक, सलून व्यावसायिक, जनरल स्टोअर्सवाले आदींसह इतर छोट्या-मोठ्या व्यवसायांचा यात समावेश आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी पर्यायी व्यवसाय अनेकांनी सुरू करून मार्ग तर काढला आहे. परंतु, लाखो रुपयांचे डिपॉझिट देऊन गाळा भाड्याने घेऊन व्यवसाय सुरू केलेल्यांना या काळात उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. परंतु, गाळा मालकांनी भाड्यापोटी लावलेला तगाद्यामुळे अनेकांचे वाद-विवाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. गाळेधारकांचे म्हणणे रास्त असले तरी व्यवसाय ठप्प झाल्याने व्यावसायिक भाडे कोठून देणार, हा यक्ष प्रश्न आहे. भाडेकरू व गाळाधारक हे दोघेही त्यांच्या भूमिकेत योग्य आहेत.
---------------------------
कोट...
नगर पंचायत कर आकारणी माफीबाबत शासनस्तरावरून कोणताही निर्णय झालेला नाही. तसा अध्यादेश शासनाकडून जारी झाल्यास त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. सध्याचा काळ हा सर्वांसाठीच कठीण बनला असून, सर्वांनीच समन्वय साधून या महामारीतील कटू प्रसंगांना सामोरे जाऊया.
- माधव खांडेकर, मुख्याधिकारी, वडूज नगर पंचायत
-------------------------------------
कोट..
खटाव तालुक्यावर यापूर्वी अनेक नैसर्गिक संकटे येऊन गेली आहेत. त्याकाळात येथील व्यावसायिकांनी भरपूर नुकसान सोसले आहे. व्यवसायातील चढ-उतार हे होत असतात. मात्र, कोरोना महामारीत व्यावसायिकांची कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे शासनाने इतर कर आकारणी बरोबरीने घरफाळा व वीजबिल माफीबाबत तातडीने निर्णय घेऊन व्यावसायिकांना दिलासा द्यावा.
- पांडुरंग गुरव, व्यावसायिक, वडूज
-------------------------------