सातारा जिल्ह्यातील ६५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी-- सरकारकडून घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 11:15 PM2019-12-21T23:15:00+5:302019-12-21T23:15:09+5:30
दरम्यान, शेतक-यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने कर्जमाफीची घोषणा सातत्याने केली जात आहे. २००८ मध्ये केंद्र शासनाने कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर २००९ मध्ये वंचित राहिलेल्या शेतकºयांना राज्य शासनाकडून कर्जमाफी देण्यात आली. २०१४, २०१७ मध्येही कर्जमाफीची घोषणा झाली.
सागर गुजर ।
सातारा : राज्य शासनाने महात्मा फुले कर्जमाफी योजनेची घोषणा केल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेची थकित कर्ज ठेवलेल्या तब्बल ६५ हजार २८९ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या कर्जमाफीच्या माध्यमातून जिल्हा बँकेचे शेतक-यांकडे थकित असलेले २८१ कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. जिल्ह्यामध्ये ३८ बँकांच्या माध्यमातून शेतक-यांना कर्ज वाटप केले जाते. जिल्हा बँकेचा यामध्ये जवळपास ७० टक्के वाटा आहे. जिल्हा बँकेने चालू आर्थिक वर्षामध्ये २ लाख १ हजार शेतक-यांना १ हजार ९९ कोटी रुपयांचे पीक कर्ज
वाटले. त्यातील २८१ कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेमुळे हे कर्ज माफ होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, कर्जमाफीचे निकष अद्याप बँकांना कळविण्यात आले नाहीत.
दरम्यान, शेतक-यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने कर्जमाफीची घोषणा सातत्याने केली जात आहे. २००८ मध्ये केंद्र शासनाने कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर २००९ मध्ये वंचित राहिलेल्या शेतकºयांना राज्य शासनाकडून कर्जमाफी देण्यात आली. २०१४, २०१७ मध्येही कर्जमाफीची घोषणा झाली.
२०१७ मध्ये शेतक-यांचे दीड लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी करण्याचे काम अजूनही सुरू आहे. या योजनेचा जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार शेतक-यांना लाभ मिळाला. या शेतकºयांचे ४४२ कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले होते. आता नव्या योजनेमुळे शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
इतर बँकांनाच मोठा लाभ
जिल्ह्यातील जिल्हा पीक कर्ज वसुली ९४ टक्के इतकी मोठी आहे. जिल्ह्यात ९५३ विकास सेवा सोसायट्या आहेत. तर जिल्हा बँकांच्या ३१९ शाखा आहेत. या दोन्हींच्या माध्यमातून कर्जाची वसुली केली जाते. कर्ज वसुलीची यंत्रणा मजबूत असल्याने वसुलीचे प्रमाण तब्बल ९४ टक्के इतकी मोठी आहे. राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ जिल्हा बँकेपेक्षा इतर बँकांनाच जास्त होण्याची शक्यता जास्त दिसते.
२ लाख ३५ हजार ३०४ शेतकरी कर्जबाजारी..
बँक आॅफ महाराष्ट्र (अग्रणी बँक)च्या माध्यमातून सातारा जिल्ह्णातील ३८ बँका पीक कर्जाचे वाटप करतात. जिल्ह्णातील २ लाख ३५ हजार ३०४ शेतकऱ्यांना १ एप्रिल २०१९ ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत १ हजार ५७३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
पूर्वी कर्जमाफी झालेल्यांना वगळणार?
राज्य शासनाने २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती. यामध्ये दीड लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले. योजनेची अंमलबजावणी बँकांकडून अजूनही सुरू आहे. त्यातच आता नव्याने कर्जमाफीची घोषणा झाली आहे. शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नव्या योजनेचा लाभ मिळणार का? याची उत्सुकता आहे.
खरिपासह रब्बी हंगाम वाया गेल्याने जिल्ह्णातील शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्जमाफीची अत्यंत गरज होती. शासनाने कर्जमाफी दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
- संभाजी कदम, शेतकरी
कर्जमाफी योजनेमुळे नियमित कर्ज भरणाºया शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरते. कर्जमाफीची योजना पतसंस्था तसेच इतर सहकारी बँकांकडून कर्ज घेणाºया शेतकरी व शेतमजुरांनाही दिली जाणे आवश्यक आहे.
- माणिक पवार, शेतकरी