शेतात पीक असेल तरच मिळणार कर्ज
By admin | Published: January 29, 2016 09:32 PM2016-01-29T21:32:15+5:302016-01-30T00:15:22+5:30
विकास अधिकाऱ्यांचे लक्ष : सेवा सोसायट्यांना जिल्हा बँकेच्या सूचना
वाठार स्टेशन : कमी दरात कर्जव्यवस्था करणाऱ्या विकास सेवा सोसायट्यांची शेतकऱ्यांना आजपर्यंत मोठी मदत झाली. शेतात पीक असो किंवा नसो. असणाऱ्या शेतजमिनीवर कर्जाची मंजुरी मिळत होती; परंतु यापुढे सोसायट्यांचे कर्ज शेतकऱ्याला न परवडणारेच ठरणार आहे. जिल्हा बँकेने जिल्ह्यातील सर्वच सोसायट्यांना आता पीक पाहणी करूनच कर्ज देण्याच्या सूचना केल्या आहेत. जर शेतात पीक नसताना त्याला कर्जपुरवठा झाला तर त्यास जिल्हा बँकेचा विकास अधिकारी जबाबदार धरण्यात येणार असल्याने आता हे विकास अधिकारीच शेतातील पीक पाहून शेतकऱ्याला कर्जाचे वाटप करणार आहेत.
जिल्हा बँकेच्या अधिपत्याखाली गावोगावच्या विकास सेवा सोसायट्या या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कमी व्याजाने अनेक कारणांसाठी अल्पमुदत कर्ज, मध्यम मुदत कर्ज व दीर्घ मुदत कर्ज सोसायट्या वितरीत करीत आहेत. यापैकी अल्पमुदत कर्जाबाबत सध्या धोरणात्मक बदल करण्यात आला आहे.
पीक कर्जासाठी सहा टक्के व्याजाने तर जिराईत क्षेत्रासाठी १३ टक्क््यांने व्याजाने हे कर्ज यापुढे शेतकऱ्यांना मिळणार आहे. साधारण एक एकर ऊस शेती असलेल्या शेतकऱ्याला ३४ हजार रुपये कर्जाची मंजुरी आहे.
ऊसशेती असलेल्या शेतकऱ्याला ३४ हजार रुपये कर्जाची मंजुरी आहे. उसापेक्षा आले पिकास ४२ हजार ५०० रुपये कर्जाची मंजुरी आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा
शेतात ऊस किंवा आल्यासारखे
पिके असतील त्याच शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजाचा लाभ घेता येणार
आहे.
अलीकडील दुष्काळी परिस्थतीमुळे सेवा सोसायट्यांची कर्जे परतफेड करणे शेतकऱ्यांसाठी आव्हान ठरत आहेत. कित्येक शेतकरी शेतात ऊस नसतानाही उसाच्या कर्जाची रक्कम मिळवत होते; मात्र हे कर्ज वेळेत वसूल होत नसल्याची बाब अनेक सेवा सोसायट्यांच्या निदर्शनास आली आहे. याला पर्याय म्हणून शेतकरी नवे जुने कर्जप्रकरण करून दरवर्षी वेळ मारून नेत आहेत. तर काही शेतकरी सोसायटीची वसुली होऊ नये, यासाठी दुसऱ्याच्या नावानेच ऊस पाठविण्याचे काम करत आहेत. यामुळे घेतलेले कर्ज वसूल होत नसल्याची अनेक प्रकरणे आहेत.
सातारा जिल्हा मध्वर्ती बँकेने जरी नव्याने काही सूचना केल्या असल्या तरी ऊस, आल्यासारख्या पिकांची कमाल मर्यादा एकरी ६० हजार रुपये करावी तरच हा शेतकरी कुठतरी स्थिर होइल. अन्यथा आता पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळी पट्ट्यातही शेतकऱ्यांना मोठी अडचण येईल. (वार्ताहर)