कर्ज देण्याच्या बहाण्याने पावणेचार लाखांची फसवणूक, दोघांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 02:11 PM2020-02-18T14:11:02+5:302020-02-18T14:11:59+5:30
बनावट कर्ज प्रकरणातून वसुली करुन एकाची कार जप्त करून पावणेचार लाखाची फसवणूक केल्याचे दि. १६ रोजी उघडकीस आले. याप्रकरणी हैद्राबाद येथील फायनान्स कंपनीच्या मालकासह पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आणखी एकाची अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
सातारा : बनावट कर्ज प्रकरणातून वसुली करुन एकाची कार जप्त करून पावणेचार लाखाची फसवणूक केल्याचे दि. १६ रोजी उघडकीस आले. याप्रकरणी हैद्राबाद येथील फायनान्स कंपनीच्या मालकासह पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आणखी एकाची अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
आदेश बंब (रा. हैद्राबाद), विशाल उर्फ संतोष राशनकर (रा. पुणे), गिरीष शहा (रा. पुणे), विश्वनाथ महेंद्र सुपेकर व अनिकेत संतोष जाधव (दोघे रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजय विलास माळी (रा. श्रीनाथ कॉलनी, रामकुंड, सातारा) यांना कर्जाची आवश्यकता होती. हैद्राबाद येथील वीर फायनान्स कंपनीच्या वरल पाचजणांनी संगनमत करुन विजय माळी यांच्या घरी एका एजंटला पाठविले आणि कर्ज देतो असे सांगून त्यांच्या कारचे आरसी बुक, आधार कार्ड व सात धनादेश घेतले.
३ लाख ८० हजार रुपयांच्या कर्जासाठी फायनान्स कंपनीच्या लोन अॅग्रीमेंट फॉर्मवर सह्या घेतल्या. दरम्यान संबंधित फायनान्स कंपनीकडून कोणतेच कर्ज न देता कर्जाच्या वसुलीसाठी विजय माळी यांची कार जप्त करुन संबंधितांनी ३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली.
विजय माळी यांचे मित्र महेंद्र वसंतराव भोईटे (रा. खेड, ता. जि. सातारा) यांना ४ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज मंजूर करुन त्या कर्जाची रक्कम भोईटे यांना आदा न करता त्यांचे गाडीवर देखील बोजा नोंद करुन त्यांचीही फसवणूक केली. कर्ज देण्याच्या बहाण्याने बनावट कर्जप्रकरण तयार करुन दोघांना लाखो रुपयांना गंडा घातला.