स्थानिक विकास निधी कोविड लढ्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:38 AM2021-03-18T04:38:26+5:302021-03-18T04:38:26+5:30
कराड : विधान परिषदेच्या माध्यमातून स्थानिक विकासनिधीतून अखेरचा निधी दुसऱ्या टप्प्यातील कोविड लढ्यासाठी दिला आहे. त्यातून ...
कराड : विधान परिषदेच्या माध्यमातून स्थानिक विकासनिधीतून अखेरचा निधी दुसऱ्या टप्प्यातील कोविड लढ्यासाठी दिला आहे. त्यातून कराड तालुक्यातील ग्रामपंचायती, रुग्णालये व शैक्षणिक संस्थांना कोविड कीटचे वाटप करण्यात येणार आहे. १८ मार्चला विजयनगर (ता. कराड) येथे हा कार्यक्रम होणार आहे.
अशी माहिती माजी आमदार आनंदराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आनंदराव पाटील म्हणाले, २०२० मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. गेले वर्षभर कोरोनाशी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनतेचा लढा सुरू आहे. याला वर्ष पूर्ण होत असताना दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पहिल्या लाटेत समाजातून मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणात होता. कोरोना अजूनही वेगाने पसरत असताना मास्क, सॅनिटायझर या बाबींना महत्त्व आहे. गावोगावी कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने ग्रामपंचायतींना सतर्कता बाळगावी लागत आहे. ग्रामपंचायतींचे उत्पन्न पाहता ग्रामपंचायतींना कोविड कीटची गरज असल्याने आपल्या स्थानिक निधीतून त्यांना कोविड कीटची उपलब्धता करून देण्यात येत आहे. तसेच विजयनगर ग्रामपंचायतीतर्फे गावात १५ ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्याचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
१८ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता विजयनगर येथील पार्वती मल्टिपर्पज लॉन्समध्ये ग्रामपंचायतींना कोविड कीट वाटप कार्यक्रम होणार आहे. सॅनिटायझर मशीन, मास्क, पी.पी.ई. कीट, थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटर आदी साहित्य असणारे कीट वाटप करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषद साताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा व पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूध्द आठल्ये, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी भगवान जगदाळे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तहसीलदार अमरदीप वाकडे, कराड शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, कराड ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे.