स्थानिक कर्मचारी तिकीट विक्रीत मग्न!
By admin | Published: May 1, 2017 12:03 AM2017-05-01T00:03:25+5:302017-05-01T00:03:25+5:30
स्थानिक कर्मचारी तिकीट विक्रीत मग्न!
कोरेगाव : परिविक्षाधीन अधिकारी रागसुधा रामचंद्रन यांनी एका महिन्यातच सर्जिकल स्ट्राईक करत अवैध धंद्ये बंद पाडले आहेत. पोलिस मुख्यालयातील नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना बरोबर घेत सिंगम पद्धतीने त्यांनी कारवाईचे सत्र हाती घेतले आहे. एकीकडे ही कारवाई सुरू असली तरी पोलिस ठाण्याचा क्राईम रेट मात्र भलताच वाढला आहे. स्थानिक कर्मचारी पोलिस कल्याण निधीच्या कार्यक्रमाची तिकिटे विकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न भलताच निर्माण झाला आहे.
रागसुधा रामचंद्रन यांनी पदभार स्वीकारल्यानंतरच स्थानिक पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांना तातडीने बदलण्यात आले.
त्यापाठोपाठ त्यांच्याकडे शिरवळ पोलिस ठाण्याचा पदभार देण्यात आला. अप्पा कुंभार नावाच्या सहायक पोलीस निरीक्षकांना कोरेगावात धाडण्यात आले असून, त्यांची सेवा केवळ दोन ते अडीच महिने शिल्लक आहे. त्यांच्या जोडीला तीन उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी असून, दोनजण रजेवर आहेत. एक महिला उपनिरीक्षक कर्तव्यावर हजर
आहेत.
रागसुधा रामचंद्रन यांनी पोलिस मुख्यालयातील विशेष पथकाद्वारे सिंगम स्टाईलने कारवाई सुरू केली आहे. त्यांच्या कारवाईत स्थानिक पोलिस अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतले जात नाही. (प्रतिनिधी)
गुन्ह्यांची संख्या वाढली...
एकीकडे कारवाईचा धडाका सुरू असतानाच पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. खुनाच्या प्रयत्नांचे तीन गुन्हे, एक बाललैंगिक अत्याचारासह अॅट्रॉसिटीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील संशयित गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाले आहेत. त्यापैकी चिमणगावच्या गुन्ह्यातील संशयितांचे जिल्हा न्यायालयात जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. काही केल्या ते पोलिसांच्या हाती लागत नाहीत. अवैध धंद्यांवर कारवाई सुरू ठेवतानाच कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी काम करणे अभिप्रेत आहे. मात्र कोरेगावात वेगळेच घडत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी याविषयात लक्ष घालण्याची गरज निर्माण झालेली आहे.
कर्मचाऱ्यांना जबाबदारी...
सातारारोड दूरक्षेत्रासह स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना अवैध धंद्यांवरील कारवाईपासून अलिप्त ठेवले जात आहे. त्यांच्यावर पोलिस कल्याण निधीच्या मदतीसाठी दि. २ मे रोजी साताऱ्यातील शाहू स्टेडियमवर आयोजित केलेल्या ‘मराठी तारका’ या संगीतमय कार्यक्रमांची सुमारे पाच लाख रुपये किमतीची तिकिटे विकण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. प्रत्येक बिटनुसार कर्मचाऱ्यांना अंतर्गत जबाबदारीचे वाटप करण्यात आले असून, जवळपास ४० टक्के जबाबदारी पूर्णत्वाकडे गेली आहे.