स्थानिक युवकांना मिळाले ‘सह्याद्री’तील वनस्पतींचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:34 AM2021-01-22T04:34:55+5:302021-01-22T04:34:55+5:30

कोयनानगर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये साधारण दीड हजारापेक्षा जास्त वनस्पतींची नोंद आहे. यातील अनेक वनस्पती औषधे आहेत. या समृद्ध ...

Local youth got plant lessons from 'Sahyadri' | स्थानिक युवकांना मिळाले ‘सह्याद्री’तील वनस्पतींचे धडे

स्थानिक युवकांना मिळाले ‘सह्याद्री’तील वनस्पतींचे धडे

googlenewsNext

कोयनानगर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये साधारण दीड हजारापेक्षा जास्त वनस्पतींची नोंद आहे. यातील अनेक वनस्पती औषधे आहेत. या समृद्ध वनस्पती सृष्टीची माहिती स्थानिक युवकांना करून देण्यासाठी डब्ल्यूआरसीएस संस्था आणि वन विभाग यांच्यावतीने दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर कोयनानगर येथे आयोजित केले होते. या शिबिरास डॉ. राहुल मुंगीकर आणि डॉ. सुरेश जगताप यांनी मार्गदर्शन केले.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला जागतिक वारसास्थळाचे आणि जैवविविधतेचे महत्त्व आहे. त्यामुळे येथील निसर्ग आणि जैवविविधता पाहण्यासाठी दिवसेंदिवस पर्यटकांचा ओघ वाढत आहे. निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात. याचा विचार करून डब्ल्यूआरसीएस संस्था आणि वन विभाग यांच्यावतीने स्थानिक युवकांसाठी विविध प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगले ही सदाहरीत, निम सदाहरीत, आर्द्रमिश्र पानगळीची आहेत. येथील डोंगर माथ्यावरील सडे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. येथे दऱ्या-खोऱ्यात विस्तीर्ण दाट जंगल असून, येथे मोठ्या प्रमाणात प्रदेशनिष्ठ वनस्पती आढळतात. या प्रशिक्षण शिबिरामध्ये विविध उपयोगी वनस्पतींची ओळख रंजक पद्धतीने करून दिली गेली. त्यामध्ये दुर्मीळ वनस्पती वम, फणसी, खरवत, पिसा, शेंद्री, कुंभळ, वाघाटी, अंजन, नाना, असाणा, फणसाडा, राळधूप, कदंब तसेच औषध वनस्पती बेडकी, अक्कलकाडा, कवंडाळ, पाचवेल, बुरंबी, धायटी, एरंड, दिंडा, भामन आदी वनस्पतींची प्रत्यक्ष माहिती तरुणांनी घेतली. क्षेत्रभेटीवेळी अतिशय दुर्मीळ कीटकभक्षी वनस्पती दवबिंदू वनस्पती सर्वांना पाहता आली.

निसर्ग मार्गदर्शक हे पर्यटन वाढीमधील महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांनी विविध माध्यमांचा वापर करून आपल्या ज्ञानात भर घालत राहावे. फक्त वाटाड्या न होता स्थानिक जंगलातील प्राणी, पक्षी वनस्पतींची माहिती असणाो मार्गदर्शक बनावे, तसेच त्यांनी आपला निसर्ग, जैवविविधता आणि ऐतिहासिक वारसा अबाधित राहील, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. राहुल मुंगीकर आणि डॉ. सुरेश जगताप यांनी यावेळी केले.

- कोट

डब्ल्यूआरसीएस संस्थेच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी आतापर्यंत पक्षी निरीक्षण, फुलपाखरे, सह्याद्रीतील साप आणि बेडूक याविषयी शिबिरे आयोजित केली गेली आहेत. भविष्यात त्यांना अधिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- सुनील काळे

प्रकल्प अधिकारी, डब्ल्यूआरसीएस.

- कोट

प्रशिक्षणे मिळण्यापूर्वी मी पर्यटकांना फक्त जंगलातून फिरवून आणत होतो. त्यांच्याशी जास्त बोलता येत नव्हते; मात्र डब्ल्यूआरसीएस संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण मिळाल्यामुळे मी पर्यटकांना पक्षी, फुलपाखरे यांची माहिती देऊ लागलो आहे. त्यांच्याशी बोलण्याचा आत्मविश्वास वाढू लागला आहे. आजच्या प्रशिक्षणामुळे आम्हाला वनस्पतींची अधिक माहिती मिळाली आहे. त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होणार आहे.

- विजय निकम

स्थानिक युवक, वाघणे.

फोटो : २१केआरडी०२

कॅप्शन : कोयनानगर, ता. पाटण येथे स्थानिक युवकांना डॉ. राहुल मुंगीकर आणि डॉ. सुरेश जगताप यांनी वनस्पतींची माहिती दिली.

Web Title: Local youth got plant lessons from 'Sahyadri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.