शहरात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे हातपाय लॉकडाऊन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:28 AM2021-06-03T04:28:15+5:302021-06-03T04:28:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शहरात राहून आठवड्यातून एक-दोन वेळा गावी जाऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संचारबंदी आदेशामुळे गोची झाली ...

Lockdown of farmers living in the city! | शहरात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे हातपाय लॉकडाऊन!

शहरात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे हातपाय लॉकडाऊन!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शहरात राहून आठवड्यातून एक-दोन वेळा गावी जाऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संचारबंदी आदेशामुळे गोची झाली आहे. शेतकऱ्याकडे कोणतेही ओळखपत्र नसल्याने पोलिसांनादेखील काय कारण दाखवायचे, हा त्यांच्यापुढे यक्षप्रश्न असून लॉकडाऊनमध्ये त्यांचे हात-पाय बांधून पडले आहेत.

कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदी आदेश लागू केले आहेत. मात्र शेतीच्या अनुषंगाने करावी लागणारी कामे सुरू ठेवावी तसेच खते बी-बियाणे यांची दुकानेदेखील उघडी ठेवावीत, असे या आदेशात नमूद आहे. त्यामुळे बी-बियाणे खरेदीसाठी आलेले शेतकरी तसेच शेतात काम करायला जाण्यासाठी निघालेले शेतकरी यांना जाऊ द्यावे, असे संकेत आहेत.

सध्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाची गडबड सुरू आहे. पाऊस पडण्याच्या आधी मशागतीची कामे उरकून घेतली म्हणजे पेरायला मोकळं, अशी शेतकऱ्यांची धारणा असते. संचारबंदी आदेशामुळे या लगबगीला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. सातारा, कऱ्हाड, वाई, फलटण या शहरांचे नागरीकरण मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. शहरांच्या आजूबाजूच्या ३० किलोमीटर परिघातील शेतकरी मुलांचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय यांच्या निमित्ताने शहरात स्थायिक झालेले आहेत. आठवड्यातून एक-दोनदा गावी जाऊन शेतातील कामे करण्याची त्यांची पद्धत आहे, मात्र सध्याच्या घडीला त्यांना गावी जाता येत नाही.

दरम्यान, शेतकऱ्यांना गावी सोडायला कोणतीही हरकत नाही; परंतु शेतकऱ्यांच्या आडून काही अपप्रवृत्ती मोकाट फिरू लागतील आणि त्यातून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढेल, अशी प्रशासनाला भीती आहे. या परिस्थितीमध्ये गावचा भाऊ, चुलता, भावकीतील एखादी व्यक्ती यांच्या माध्यमातून लोक शेतातली कामे करून घेत आहेत.

वारंगुळ्याला पुन्हा झळाळी...

जिल्ह्यात पूर्वीपासून शेतामध्ये वारंगुळा ही पद्धत आहे. पूर्णवेळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अजूनदेखील ही पद्धत सुरू आहे; परंतु जे शेतकरी इतर नोकरी-व्यवसाय करून शेती बघतात, त्यांच्यामधील ही सवय मोडली. आता कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे लोकांना भरपूर वेळ आहे. उद्योगधंदे बंद आहेत, या व्यवसायातील लोक आता वारंगुळा पद्धतीने पुन्हा काम करताना पाहायला मिळत आहेत.

कोट..

सातारा शहरात नोकरी-व्यवसाय तसेच मुलांच्या शिक्षणानिमित्त आजूबाजूच्या गावांमधील लोक राहतात. दोन-तीन दिवसांतून एकदा गावी जाऊन शेतातील कामेदेखील करतात. या शेतकऱ्यांना अडवले जात असल्याने खरीप हंगाम कसा पार पाडायचा, हा प्रश्न त्यांना पडलेला आहे.

- अमर करंजे

कोट...

गावामध्ये एकमेकांना मदत करण्याची लोकांमध्ये उपजतच भावना असते. त्यामुळे शहरात राहणारा शेतकरी गावी जाऊ शकला नाही तरी पेरणीची कामे लोकांच्या माध्यमातून होतील; परंतु जो शेतकरी गावातून शहरांमध्ये बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी येणार आहे, त्याला रोखले जाऊ नये.

- बाळासाहेब गोसावी

फोटो ओळ : सातारा शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये स्थानिक शेतकरी खरीप हंगामाच्या कामात गुंतलेले आहेत. सातारा शहराजवळील अंबेदरे परिसरात शेतकऱ्यांची चाललेली लगबग. (छाया : सुनील जाधव)

Web Title: Lockdown of farmers living in the city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.