लॉकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक आर्थिक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:35 AM2021-04-26T04:35:15+5:302021-04-26T04:35:15+5:30
रामापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील एक वर्षापासून लॉकडाऊन, कोरोनाचे निर्बंध लागू आहेत. यामुळे सर्वसामान्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ...
रामापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील एक वर्षापासून लॉकडाऊन, कोरोनाचे निर्बंध लागू आहेत. यामुळे सर्वसामान्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही निर्बंध उठवून कुठेतरी कमाई सुरू होत होती. त्यामुळे लहान व्यापाऱ्यांची गाडी हळूहळू रुळावर येत होती. त्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे अडचणीत भर पडली आहेत.
पाटण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, कोरोनाच्या वाढत असलेल्या रुग्णसंख्येला अटकाव करण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. तो गरजेचाही आहे. परंतु या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसाबरोबर जे छोठे व्यापारी, दुकानदार, चहा टपरी व्यावसायिकांचे मात्र हाल होत आहेत.
कोरोनामुळे तालुक्यातील शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातसुद्धा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे वीटभट्टी कामगारापासून ते शेत मजुरापर्यंत सर्वांच्या हाती काम राहिले नाही.
गेल्या एक वर्षापासून कोरोनामुळे सगळ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात छोटे व्यावसायिक, दुकानदार, मजुरांची संख्या जास्त प्रमाणात आहे. हातावरचे पोट असलेल्या लोकांची अवस्था फार दयनीय झाली आहे.
व्यवसाय सुरू करताना नागरी बँका आणि स्थानिक पतसंस्थांकडून कर्ज काढून व्यवसाय सुरू केले. व्यवसायाला चांगली सुरुवात झाली होती. बँकांचे, पतसंस्थांचे हप्तेही वेळेत जात होते. मात्र मागील मार्चपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकांचे हप्तेदेखील वेळेत भरता आले नाहीत. व्यवसाय बंद, मात्र बँकेचे व्याज चालू आहे. त्यामुळे बँकांचे हप्ते भरायचे कसे? हा प्रश्न तालुक्यातील छोटे व्यापारी आणि व्यावसायिक यांना पडत आहे.