‘लॉकडाऊन’ने वाढला महागाईचा टक्का!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:40 AM2021-05-11T04:40:57+5:302021-05-11T04:40:57+5:30
कऱ्हाड : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत असतानाच सामान्यांना महागाईचा वाढता टक्काही सतावताना दिसतोय. ‘लॉकडाऊन’मुळे निर्माण झालेला तुटवडा लक्षात ...
कऱ्हाड : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत असतानाच सामान्यांना महागाईचा वाढता टक्काही सतावताना दिसतोय. ‘लॉकडाऊन’मुळे निर्माण झालेला तुटवडा लक्षात घेत अनेक रिटेल विक्रेत्यांनी जीवनावश्यक वस्तुंच्या दरातही वाढ केली असून, होलसेल माल मिळत नसल्याचे सांगत रिटेल विक्रेते मनमानी दर वाढवत आहेत. त्यामुळे गावोगावच्या दरात तफावतही दिसत आहे.
जिल्ह्यात होलसेल व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करून तो ग्रामीण भागात विकणाऱ्या रिटेल विक्रेत्यांनी मंदीत कमाईची संधी शोधली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे बाजारपेठा बंद आहेत. परिणामी, उपलब्ध असलेला किराणा माल चोरीछुपे जादा दराने विकला जातोय. ग्रामीण भागात ही परिस्थिती दिसून येत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठांची गावे ओस पडली आहेत. शहरातील व्यापारीपेठांना कुलूप लागले आहे. धान्य, तेल, डाळ तसेच इतर वस्तुंचे होलसेल विक्रेतेही ‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेत. परिणामी, होलसेल दरात वस्तूच मिळत नसल्याचे रिटेल विक्रेते सांगतायत.
वास्तविक सातारा, कऱ्हाडसारख्या शहरातील मोठ्या रिटेल विक्रेत्यांकडून माल खरेदी करून तो गावातील किराणा दुकानांमधून विकला जातो. रिटेल विक्रेते मूळ किमतीत थोडीफार वाढ करून त्याची विक्री करीत असतात; मात्र सध्या लॉकडाऊन असून, शहरातून माल मिळत नाही. परिणामी, अनेक रिटेल दुकानदारांनी उपलब्ध माल जादा दराने विकण्याचा सपाटा लावला आहे. दरवाढीचा टक्काही वेगवेगळा आहे. काही गावात कमी तर काही गावात सरासरीपेक्षा जास्त किमतीने मालाची विक्री केली जात आहे. मालाची उपलब्धता पाहून दर ठरविला जात आहे. या दरांवर सध्या कोणाचेच नियंत्रण नसल्याची परिस्थिती आहे.
- चौकट
दाद कुणाकडे मागायची..?
एखाद्या ग्राहकाने विक्रेत्याकडे दराबाबत तक्रार केल्यास मालच शिल्लक नसल्याचे सांगुन पाहिजे असल्यास याच दरात घ्या. नाहीतर दुसरीकडे जा, असे सुनावले जात आहे. त्यामुळे ग्राहकांनाही नाइलाजास्तव जादा दराने त्याची खरेदी करावी लागत असल्याचे दिसते.
- चौकट
कालबाह्यता तारीख तपासून घ्या!
लॉकडाऊनमुळे सर्वच दुकाने बंद आहेत. काही दुकानांमध्ये पंधरा दिवसांपूर्वीचा माल अद्यापही शिल्लक आहे. दही, तूप, लस्सी, बिस्किट, गोळ्या व इतर खाद्यपदार्थ नाशवंत असतात. त्याची वैधता तारीख पाकिटावर लिहिलेली असते. कालबाह्य झालेल्या खाद्यपदार्थांची चोरीछुपे विक्री होत असल्याचेही सध्या दिसते. याबाबत ग्राहकांनी दक्ष राहून तारीख तपासूनच वस्तू खरेदी करणे गरजेचे बनले आहे.
- चौकट (फोटो : ०७केआरडी०१)
वस्तुंची सरासरी दरवाढ
तूर डाळ, मूग डाळ, हरभरा : २० टक्के
तांदूळ, गहू, ज्वारी : १५ टक्के
खाद्यतेल : २० टक्के
साखर : ५ टक्के
शाबू, वरी : ५ टक्के
(रिटेल विक्रीनुसार)
- चौकट
प्रतिकिलो सरासरी बाजारभाव
तूर डाळ : ११० ते १२० रु.
मूग डाळ : १०० ते १२५ रु.
हरभरा : ७० ते ८० रु.
तेल : १३० ते १५० रु.
तांदूळ : २५ ते ६० रु.
गहू : २५ ते ४० रु.
ज्वारी : ३५ ते ४५ रु.
साखर : ३८ ते ४२ रु.
फोटो : १०केआरडी ०२, ०३
कॅप्शन : प्रतीकात्मक