लाॅकडाऊन केल्यास बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:40 AM2021-03-31T04:40:04+5:302021-03-31T04:40:04+5:30
कराड : राज्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. गतवर्षीपेक्षा जास्त रुग्ण दरदिवशी सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन ...
कराड : राज्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. गतवर्षीपेक्षा जास्त रुग्ण दरदिवशी सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन करावा का? याबाबत वेगवेगळे मतप्रवाह पुढे येत आहेत. मात्र, राज्य पातळीवर लाॅकडाऊनची अपरिहार्यता निर्माण झाल्यास बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी. अशी मागणी काँग्रेसचे नेते , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
चव्हाण यांनी पत्रकात म्हटले आहे की, विदर्भातील अमरावती, नागपूरपासून सुरू झालेली कोरोनाची दुसरी लाट मुंबई-पुण्यात, मराठवाडा आणि राज्यभरात वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन करावा का? याबाबत वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक मत व्यक्त करू लागले आहेत. मात्र, सरकार समोर गंभीर प्रश्न आहे.
लाॅकडाऊन करावाच लागला तर त्याची जनतेला पूर्व कल्पना द्यावी. लाॅकडाऊनचा कालावधी कमी ठेवावा. खासगी वाहनातून प्रवास मुभा द्यावी. शेतमाल तसेच औद्योगिक मालाची वाहतूक चालू ठेवावी. लसीकरणाचे प्रमाण वाढवावे आणि महत्त्वाचे म्हणजे बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने द्यावी. त्यासाठी प्रसंगी आमदार, खासदार यांचा स्थानिक विकास निधी वापरावा.
गतवर्षी मार्चमध्ये केंद्र सरकारने अचानक कोणतेही नियोजन न करता लाॅकडाऊन घोषित केले. या निर्णयाचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला. भारतातील तीन कोटींहून अधिक लोक दारिद्र्य रेषेखालील ढकलले गेले. त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊनच लाॅकडाऊनचे नियोजन करावे. असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.