माडगूळकरांच्या घराला कुलूप
By admin | Published: December 5, 2015 11:59 PM2015-12-05T23:59:57+5:302015-12-06T00:03:14+5:30
पोलिसांचा कसून शोध : ठेवीदारांची चौकशी
सातारा : जिजामाता बँकेचे ठेवीदार रमेश चोरगे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेले जिजामाता बँकेच्या अध्यक्षा अॅड. वर्षा माडगूळकर आणि शिरीष कुलकर्णी या दाम्पत्याच्या घराला कुलूप असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
जिजामाता बँकेमध्ये ठेवलेली एक लाखाची ठेव परत दिली नाही म्हणून रमेश चोरगे यांनी गुरुवारी रात्री राजधानी टॉवर्सवरून उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी चोरगे यांच्या पत्नीने फिर्याद दिल्यानंतर माडगूळकर दाम्पत्यावर फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. या घटनेमुळे सहकार क्षेत्रात आणि ठेवीदारांमध्येही प्रचंड खळबळ उडाली. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा गुन्हा दाखल होताच माडगूळकर दाम्पत्य साताऱ्यातून गायब झाले. पोलिसांनी रात्री आणि शनिवारी दिवसभर त्यांचा शोध घेतला असता त्यांच्या घराला कुलूप असल्याचे निदर्शनास आले. हा गुन्हा दोघांवर वैयक्तिक पातळीवर असल्याने बँकेची कागदपत्रे तपासण्यामध्ये अडचणी येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, ज्या दिवशी घटना घडली. त्यावेळी चोरगेंसोबत जे ठेवीदार होते. त्यांच्याकडेही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. ठेवीदारांच्या जबाबातून या प्रकरणातील आणखी काही माहिती उजेडात येण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)