कुलूप.. जिजामाता बँकेला ; अन् प्रशासनाच्या तोंडालाही !
By admin | Published: July 18, 2016 11:12 PM2016-07-18T23:12:52+5:302016-07-19T00:16:04+5:30
अवसायक संभ्रमात : सहकार आयुक्तांकडे म्हणणे सादर केल्याची माहिती
सातारा : जिजामाता महिला सहकारी बँकेवर राज्याच्या सहकार विभागाने नेमलेले अवसायक विशेष लेखापरीक्षक धनंजय गाडे यांना अद्यापही बँकेचा ताबा मिळालेला नाही. बँकेला भले मोठे कुलूप असून, कर्मचारी वर्गही याठिकाणी उपलब्ध होत नसल्याने त्याबाबतचा प्रस्ताव त्यांनी सहकार आयुक्तांकडे पाठविला आहे. या प्रस्तावात त्यांनी बँकेबाबत काय कार्यवाही करायची? याबाबत मार्गदर्शन मागितले आहे.
रिझर्व्ह बँकेने जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना काही दिवसांपूर्वी रद्द केला होता. यानंतर सहकार विभागामार्फत अवसायक नेमण्याची कार्यवाही करण्यात आली. सहकार आयुक्तांनी जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग २ धनंजय गाडे यांची जिजामाता महिला सहकारी बँकेवर अवसायक म्हणून नेमणूक करण्यात आली. हा आदेश प्राप्त झाल्यानंतर अवसायक गाडे यांनी बँकेशी पत्रव्यवहार केला. बँकेने कुठल्याही प्रकारचे व्यवहार करू नयेत, तसेच बँकेचे रेकॉर्ड ताब्यात देण्यात यावे, अशा सूचना गाडे यांनी बँकेला लेखी कळविल्या होत्या; परंतु बँकेकडून प्रतिसाद मिळाला नाही.
दि. १२ जुलै रोजी गाडे बँकेचा पदभार घेण्यासाठी गेले असता, त्या ठिकाणी बँकेला कुलूप असल्याचे आढळून आले. बँकेचे प्रतिनिधी त्याठिकाणी उपलब्ध होत नसल्याने बँकेचे रेकॉर्ड, कर्ज ठेवींची यादी आदी उपलब्ध होत नाही. याबाबत गाडे यांनी सहकार आयुक्तांकडे मार्गदर्शन मागितले आहे. त्यांच्या सुचनेनुसार पुढील कारवाई केली जाईल, असे गाडे यांनी सांगितले.
सहकार विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्याला बँकेकडून सहकार्य होत नाही. तरीही त्यापुढे कारवाई होत नसल्याने ठेवीदारांचा प्रश्न आणखी वाढण्याची चिन्हे आहे. बँकेचे रेकॉर्ड मिळाल्यानंतर ठेवीदारांच्या याद्या ठेव विमा महामंडळाकडे सादर करायच्या आहेत. बँकेचा ताबा मिळायला जितका वेळ जाईल, तितका ठेवींचे पैसे मिळायलाही विलंब होणार आहे. बँकेवर ताबा मिळाल्यानंतर साधारणपणे सहा ते सात महिन्यांनंतर ठेवीदारांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, त्यातूनही ज्यांच्या ठेवी एक लाखाच्या आत आहेत, त्यांनाच याचे संरक्षण असणार आहे. (प्रतिनिधी)
बँकेचे रेकॉर्ड मिळणे आवश्यक आहे. ठेवी व कर्जांची यादी मिळाली तर कार्यवाही करणे सोपे जाणार आहे. मात्र, अद्याप बँकेचा ताबा मिळत नसल्याने मी आयुक्त कार्यालयाचे याबाबत मार्गदर्शन मागितले आहे.
- धनंजय गाडे, अवसायक, जिजामाता महिला सहकारी बँक