Lok Sabha Election 2019 नाराजांचा फटका; उमेदवाराला धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:59 PM2019-04-15T22:59:21+5:302019-04-15T22:59:48+5:30
सातारा-जावळी : विधानसभा मतदार संघात युतीची ताकद आहे. सातारा पालिकेत भाजपचे सहा नगरसेवक, मेढा नगरपंचायतीत नगराध्यक्षांसह युतीचे काही नगरसेवक ...
सातारा-जावळी : विधानसभा मतदार संघात युतीची ताकद आहे. सातारा पालिकेत भाजपचे सहा नगरसेवक, मेढा नगरपंचायतीत नगराध्यक्षांसह युतीचे काही नगरसेवक आहेत. जावळीत भाजपचा जिल्हा परिषद सदस्य आहे. सुरुवातीला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अमित कदम अंतर्गत कुरघोडीमुळे नाराज होते; पण आता सक्रिय आहेत.
वाई : मतदार संघात भाजप-शिवसेना एकत्रित युतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसतात. मात्र, या युतीमधील घटक पक्ष असणाऱ्या ‘रिपाइं’ अद्यापही सक्रिय दिसत नाही. तर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणारे व युतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आश्वासन देणारे पुरुषोत्तम जाधव प्रचारात सक्रिय दिसत नाहीत.
कोरेगाव : मतदार संघात सेना आणि भाजपात समन्वयाचा अभाव आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभेत हे प्रकर्षाने दिसून आले. भाजपचा एकही पदाधिकारी व्यासपीठावर अथवा फलकावर दिसून आला नाही. सभा सायंकाळी झाली; तत्पूर्वीच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोअर टीमसह कोरेगावात भेटीगाठी घेतल्या होत्या.
सातारा-जावळी : या मतदार संघाचे आमदार राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे भोसले आहेत. शिवेंद्रसिंहराजे गटाचे नगरसेवक खुला प्रचार करताना दिसत नाहीत. तर उदयनराजे भोसले आणि वसंतराव मानकुमरे हे जुना वाद विसरून एकत्र आले आहेत. मात्र, आघाडीतील काहीजण युतीच्या उमेदवारांचा छुपा प्रचार करताना दिसतात.
वाई : आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विजयासाठी आमदार मकरंद पाटील यांनी कंबर कसली आहे. कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत; पण जिल्हा परिषद निवडणुकीनंतर नाराज असलेले राष्ट्रवादीचे नेते प्रचारापासून दूर आहेत. तसेच मदन भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
कोरेगाव : या मतदार संघात राष्ट्रवादीचा आमदार आहे. तर या निवडणुकीत काँग्रेसने सवतासुभा मांडला असून, स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबविली आहे. राष्ट्रवादीतही बेबनाव असून, शरद पवार निष्ठ स्वाभिमानी विचार मंच स्वतंत्रपणे उदयनराजे भोसले यांचा प्रचार करत आहे. यामुळे कोणताही ताळमेळ दिसत नाही.