Lok Sabha Election 2019 : शक्तिप्रदर्शन करुन नरेंद्र पाटील यांचा अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 04:07 PM2019-03-30T16:07:35+5:302019-03-30T16:09:54+5:30
शिवसेना-भाजप-रिपाइं व मित्र पक्षांच्या युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी शनिवारी मोठे शक्तिप्रदर्शन करत सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
सातारा : शिवसेना-भाजप-रिपाइं व मित्र पक्षांच्या युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी शनिवारी मोठे शक्तिप्रदर्शन करत सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
राजवाड्यावरील गोलबागेत असणाऱ्या श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) यांच्या पुतळ्याला नरेंद्र पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. याच ठिकाणी नारळ फोडून फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच ढोल ताशाच्या गजरात रॅली काढण्यात आली. मोती चौक, कमानी हौदमार्गे ही पोवईनाक्यावर आली. या ठिकाणी पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तिथून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ही रॅली आली. या रॅलीत कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी देत होते.
सातारा शहरातून मोठी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री विजय शिवतारे, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, कृष्णा खोेरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील, आ. शंभूराज देसाई, निरंजन डावखरे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार मदन भोसले, महेश शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, दीपक पवार, नगरसेवक धनंजय जांभळे, विजयकुमार काटवटे, अॅड. भरत पाटील आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पोलिसांनी आचारसंहितेचे कारण सांगून मोजक्या लोकांसोबतच नरेंद्र पाटील यांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश दिला. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री दिवाकर रावते म्हणाले, कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे लक्ष लागून रााहिले आहे. जिल्ह्यातील जनतेने शिवसेनेचा यापूर्वी खासदार निवडून दिला होता. माथाडी कामगारांना दिलेल्या हक्काचा सन्मान आण्णासाहेब पाटील यांनी केला होता. या निवडणुकीत युती एकसंधपणे लढणार आहे.
पत्रकारांना प्रवेश नाकारला!
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना पोलिसांनी प्रवेश नाकारला. प्रवेशद्वारावरच पत्रकारांना अडविण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनीच तशा सक्त सूचना केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यानंतर उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने आत प्रवेश केल्याने पत्रकारांनाही शेवटी प्रवेश देण्यात आला.
रिपाइंच्या नेत्यांची गैरहजेरी
नरेंद्र पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत रिपाइंचे स्थानिक नेते सहभागी झालेले नव्हते. रिपाइं हा महायुतीचा घटक पक्ष असतानाही हे लोक गैरहजर असल्याबाबत पत्रकारांनी मंत्री दिवाकर रावते यांना छेडले असता ते म्हणाले, आमची महायुती आहे. केंद्रीय मंत्री व रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना महायुतीचे काम करण्याबाबत सूचना केल्या आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र रिपाइं कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारात उतरले आहेत. साताऱ्यातील स्थानिक नेत्यांशी महायुतीचे नेते बोलतील.