Lok Sabha Election 2019 Result: साताऱ्यात उदयनराजे फॅक्टर पुन्हा चालणार की शिवसेना गड भेदणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 07:39 AM2019-05-23T07:39:04+5:302019-05-23T07:40:02+5:30
यंदा शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांचे मोठे आव्हान उदयनराजे भोसले यांच्यापुढे आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसच्या विरोधात भाजप-शिवसेना अशीच ही लढत ठरणार आहे.
सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला जिंकून घेण्यासाठी भाजप-शिवसेना-रिपाइं यांच्या महायुतीने सातत्याने टकरा दिल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत तर युती नियोजनबद्धपणे उतरलेली पाहायला मिळते. सातारा लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व मागील दहा वर्षांपासून छत्रपती उदयनराजे भोसले हे करीत आहेत. उदयनराजेंच्या विरुद्ध माथाडी नेते नरेंद्र पाटील हे शिवसेनेकडून मैदानात उतरले आहेत. माथाडी कामगार नेता म्हणून प्रतिमा असलेले नरेंद्र पाटील हे राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिल्यानंतर त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला. मात्र, जागा वाटपामध्ये साताऱ्याची जागा शिवसेनेला गेली. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली. गेल्या दोन निवडणुकांत खासदार उदयनराजे भोसले हे या मतदार संघात मोठ्या फरकाने निवडून येत आहेत. यंदा शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांचे मोठे आव्हान उदयनराजे भोसले यांच्यापुढे आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसच्या विरोधात भाजप-शिवसेना अशीच ही लढत ठरणार आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना मागील निवडणुकीत 5 लाख 22 हजार 531 मते मिळाली होती तर अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांना 1 लाख 55 हजारे मते मिळाली होती.
दरम्यान, 2014 च्या निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी काहीशी वाढली आहे. मागील निवडणुकीत 17 लाख 19 हजार 998 एकूण मतदार होते. त्यापैकी 9 लाख 76 हजार 702 म्हणजे 56.79 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. यंदाच्या निवडणुकीत एकूण 18 लाख 38 हजार 987 मतदारांपैकी 11 लाख 9 हजार 434 म्हणजे 60.33 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत 1 लाख 32 हजार 732 मतदान जास्त झाले आहे. त्यामुळे हे वाढलेले मतदान कोणासाठी असेल याची उत्सुकता आहे.