Lok Sabha Election 2019 सातारकर पुन्हा एकदा इतिहास रचतील : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:45 AM2019-04-03T00:45:18+5:302019-04-03T00:48:08+5:30

पारंपरिक वाद्यांची साद, तुतारींचा निनाद, लमाणी महिलांचे पारंपरिक लेझीम नृत्य, ‘हॅटिट्रक होणारच’च्या टोप्या, महिलांबरोबरच आबालवृद्धांची गर्दी, ठिकठिकाणी औक्षण

Lok Sabha Election 2019 Satara will create history again: Ajit Pawar | Lok Sabha Election 2019 सातारकर पुन्हा एकदा इतिहास रचतील : अजित पवार

सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मिरवणुकीत हजारो समर्थक सहभागी झाले होते. बंजारा समाजाच्या महिलांनी लेझीम खेळत आकर्षक नृत्य केले. हलगीवर थाप टाकण्यापूर्वी वादकाच्या उडीने लक्ष वेधले.

googlenewsNext
ठळक मुद्देमोदींना अंतिम दिवस समीप आल्याची भीती

सातारा : पारंपरिक वाद्यांची साद, तुतारींचा निनाद, लमाणी महिलांचे पारंपरिक लेझीम नृत्य, ‘हॅटिट्रक होणारच’च्या टोप्या, महिलांबरोबरच आबालवृद्धांची गर्दी, ठिकठिकाणी औक्षण करणाऱ्या सवाशिणी, इमारतींवरून होणारी पुष्पवृष्टी आणि रणरणत्या उन्हातही तरुणाईचा जल्लोष अशा उत्साही वातावरणात राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अजित पवार यांनी सातारकर पुन्हा एकदा इतिहास रचतील, असा विश्वास व्यक्त केला.

उदयनराजे भोसले यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदराव पाटील, माथाडींचे नेते अविनाश रामिष्टे, दमयंतीराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, रजनी पवार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या निवासस्थानी जलमंदिर येथे कल्पनाराजे भोसले, दमयंतीराजे भोसले यांच्यासमवेत भवानीमातेचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रतापसिंहराजे भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. राजवाडा परिसरातील प्रतापसिंह महाराज (थोरले) यांच्या जवाहर बागेतील पुतळ्यास अभिवादन केले. राजपथावरून कमानी हौद, शेटे चौकमार्गे पोलीस मुख्यालयासमोरून पोवई नाका अशी रॅली काढण्यात आली. पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले, त्यानंतर याच ठिकाणी सभा घेण्यात आली.

आ. अजित पवार म्हणाले, बेरोजगारी वाढविण्यात मोदी यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी आपला वेळ वैयक्तिक टीका टिपण्णीपेक्षा विधायक कामासाठी घालवावा.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील या मोजक्या नेत्यांसोबत उदयनराजे भोसले यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

इथं मोदी पेढा...सातारकर उदयनराजेंसाठी वेडा
पोवई नाका येथे झालेल्या भाषणात केंद्रसरकारची खिल्ली उडविण्यात आली. देशात कोणतेही मोदी फेमस असतील, साताºयात मात्र मोदी पेढा आणि सातारकर उदयनराजेंसाठी वेडा, हे समीकरण आहे. हे समीकरण कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही. त्यामुळे मागच्यावेळी पेक्षा अधिक मताधिक्य देण्यासाठी मतदारांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केले.

सातारा लोकसभेसाठी आतापर्यंत आठ उमेदवारांचे अर्ज दाखल
सातारा लोकसभा मतदार संघातून आत्तापर्यंत आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले, शिवसेनेचे नरेंद्र पाटील, वंचित आघाडीचे सहदेव ऐवळे, बहुजन समाज पार्टीचे आनंदा थोरवडे तर अपक्ष उमेदवारांत किशोर धुमाळ, शैलेंद्र वीर, सागर भिसे यांचा समावेश आहे.
 

अजान होईपर्यंत भाषण थांबले
पोवई नाक्यावर खासदार उदयनराजे भोसले यांचे भाषण सुरू असताना ध्वनिक्षेपकावर अजान सुरू झाली. हा आवाज ऐकताच उदयनराजेंनी आपले भाषण थांबवले. अजान संपल्यानंतर उदयनराजेंनी आपले भाषण पुढे चालू केले.
‘रिपाइं’ गटाचाही सहभाग
राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी रिपाइंचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. मोती चौकापासून हातात रिपाइंचे झेंडे घेऊन हे कार्यकर्ते घोषणा देत रॅलीत सहभागी झाले. रॅलीच्या अग्रभागी राहून या कार्यकर्त्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले.


 

Web Title: Lok Sabha Election 2019 Satara will create history again: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.