राज ठाकरे साताऱ्यात म्हणणार 'राजाला साथ द्या'; उदयनराजेंसाठी घेणार सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 01:47 PM2019-04-04T13:47:31+5:302019-04-04T13:49:20+5:30
सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेणार असल्याची शक्यता आहे.
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेने माघार घेतली असली तरी भाजपाविरोधात प्रचार करण्यासाठी राज ठाकरे राज्यभरात सभा घेणार असल्याची माहिती आहे. सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेणार असल्याची शक्यता आहे.
बुधवारी सातारा जिल्हयातील मनसे पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छ.उदयनराजे यांना जाहीर पाठिंबा दिल्याची माहिती उदयनराजे भोसले यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली. त्यामुळे राजेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे सातारा जिल्ह्यामध्ये सभा घेणार असल्याचं सांगण्यात येतंय.
सातारा लोकसभा मतदारसंघातून अलिकडेच भाजपामधून शिवसेनेत प्रवेश केलेले नरेंद्र पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नरेंद्र पाटील यांची माथाडी कामगार नेते म्हणून ओळख असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचं शिवसेना-भाजपा युतीकडून सांगण्यात येतय. याठिकाणी नरेंद्र पाटील यंदा बाजी मारणार असल्याचा दावा युतीने केला आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही सातारा लोकसभा मतदारसंघासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचं समजतंय, याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे उदयनराजे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी साताऱ्यात हजर झाले. मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उदयनराजे भोसले हे खासदार म्हणून साताऱ्यातून निवडून गेले होते. मात्र दरम्यानच्या काळात उदयनराजेंविरोधात स्थानिक राष्ट्रवादीचे नेतेच नाराज असल्याचं चित्र होतं. त्यामुळे राष्ट्रवादी उदयनराजेंना तिकीट देणार का यावरही प्रश्नचिन्ह होतं. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करत पुन्हा एकदा उदयनराजे भोसले यांना मैदानात उतरवलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जवळीत वाढत असल्याचं दिसून आलं आहे. मागच्याच आठवड्यात राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जावून पवारांची भेट घेतली होती. जवळपास अर्धातासाहून अधिक वेळ या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. राज्यभरात राज ठाकरे यांच्या सभेचा फायदा आघाडीच्या उमेदवारांना मिळू शकतो. मात्र राज ठाकरे थेट आघाडीच्या व्यासपीठावर उपस्थित न राहता स्वतंत्रपणे मनसेच्या व्यासपीठावरून सभा घेतील असंही समजतंय.